आनंद सुदिन आजी आला सदनाला शुभकाला, डोहाळे पुसे श्रीकृष्ण भिमक तनयेला ॥धृ॥
न रुचे बहुपरीचे तिजला पक्वान्न न पचे, प्रथम मास नच चैन जिवाला मधुर फळे आणण्याला द्या वर्दी झणी माळ्याला ॥१॥
आंबे डाळींबे द्राक्षे अननस मुसंबे सफरचंद गुलकंद आणविला देवकी देत सुनेला म्हणे नाजूक ही सुनबाला ॥२॥
बनवा माल नवा, हलवा मुंबईचा आणवा, थंडगार द्या फिल्टर वाटर सरबत हो पिण्याला, हा उष्ण उन्हाळा आला ॥३॥
दिवसें दिवस कसे कोवळे पिवळे स्वरुप दिसे द्वीतीय मास संपूर्ण जहाला तेज चढे स्वरुपाला तनु लाजवी रंभेला ॥४॥
तिसरा मास पुरा होता पहिली ओटी भरा, चीर चोळी घाला भिमकीला, लावूनी हळदी कुंकाला हरी हसतो बघूनी मनाला ॥५॥
चवथा मास अता करीती चेष्टेच्या बाता, सख्या सुभद्रा मिळूनी सुदंरा जाती हवा खाण्याला, तिज घेऊनी कुंजवनाला भरली यमुना खेळे रंगत वनमाळी, कुंजविहारी भरी पिचकारी भिजवी या वहिनीला, हा उभय रंग तुम्ही खेळा ॥६॥
हिरवा शालू नवा, डोहाळे जेवण सुरू करवा, घाला वेणी मध्ये भरवा, पाचमास होता भिमकीला, हिरवा चूडा करी घाला, करु ओटी भरण सोहळ्याला ॥७॥
नारी म्हणती हरी एक दिन जाऊ यमुना तीरी, पूर्ण चन्द्र तू आम्ही चांदण्या जलक्रिडा करण्याला, मेळा करू गोळा नारी नगरीच्या सकळा झोपाळ्या वरी भोजन घाला, द्या मंडप फूल बागेचा सजवा मंडप हा हंड्या झुंबर लावुनीया, छत झालरी बहू श्रृंगारी, थाट बहू केला, करु भोजन सर्व स्त्रीयाला ॥८॥
साजूक हा पाक करा नवविधी पक्वाने, आवरा थाट माट बहू पाट रांगोळ्या भोजन सोहळा झाला, त्या रुख्मीणी गर्भवतीला ओटी भरु, मोठी झाली सदनाची दाटी, भिमकी गोरटी हरी जगजेठी, नटूनी कसा हरी आला झणी चौका बसाया, द्वारी वाजंत्री हो तो सोहाळा, बहूगजरी हळदी कुंकू शर्करा वाटती पान विडे सकलाना, हा मास सातवा झाला ॥९॥