कंठी ज्याच्या तुळशीचे हार त्याशी माझा नमस्कार ॥धृ॥
वसुदेवा पोटी जन्म घेतला गोपीच्या प्रेमा धावूनी आला, बालपण लीला दाखवी नंदाला कंस मारण्याचा केला करार ॥१॥
पुंडलीकासाठी पंढरीशी आला अजुनी तो उभा खाली नाही बसला -प्रेमे भजा त्या श्रीगोविंदाला रुक्मीणीकांता देत से वर ॥२॥
जनी संगे दळीता नाही तो शिणला मिराबाई साठी तो विष प्याला नामदेवासाठी सावत्या पोटी लपला कबिराच्या मातेचा खातसे मार ॥३॥
हरी दिसे सांवळा पिंताबर पिवळा कंठी कौस्तुभमणी, गळी वैजयंती माळा श्रीवत्सलांछन शोभे वक्षस्थळा दामाजीसाठी होतसे महार ॥४॥
एकनाथ घरी पाणी आणितो गोपाळ गो या कुंभाराचे उठविले बाळ कान्होपात्र छळीता केला प्रतिपाळ भक्तांच्या संकटी धावे सत्वर ॥५॥