सावधान सावधान वाचे बोला दत्तनाम ॥धृ॥
काळाचे भय आहे मग कैसे अवधान । दहा वर्षे बालपण वीस वर्षे तारुण्य ।
अंगी जडे अभिमान तेव्हा न घडे साधन ॥१॥
तिसाची होय भरती कन्या पुत्र लाभ होती । त्यांचीच पडे भ्रांती स्वरूपाची होय स्थीती ॥२॥
चाळीस वर्षे झाली डोळ्या चाळीसी आली । नेत्राची भूल पडली येता जाता न दिसे जवळी ॥३॥
पन्नासाची होय भरती दंतपंक्ती हालती । शाम केस शुभ्र होती त्याला म्हातारा म्हणती ॥४॥
साठीच्या बुद्धीकाठी वसावस लागे पाठी । हाती घेऊनिया काठी त्याला हसती पोरटी ॥५॥
सत्तराच्या विवंचना बैसल्याने उठवेना । उठल्याने चालवेना दिवसेंदिवस दीनवाणा ॥६॥
चार विसा मिळूनी येशी जीव झाला कासाविस । जलाविना मत्स्य जैसा मग कैसा हिंडे देश देशा ॥७॥
नवापुढे दिले पूज्य सुख सांगतसे तुज । म्हणतेस माझे माझे आता कोण आहे तुझे ॥८॥
राजहंस उडूनी गेला देह कोरडा पडला । जन म्हणती मेला मेला, मोठा आनंद करुनी गेला ॥९॥
आता म्हणे गुरुदास सोडा संसाराची आस । सांगतो मी सज्जनास धरा सद्गुरुची कास ॥१०॥