उत्तासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ४८)
उत् हा उपसर्ग तीव्रता व उत्कटता दाखविणारा आहे. आणि तान ह्या क्रियापदामध्ये पसरणे, लांबवणे, ताणणे हे अर्थ येतात. या आसनामध्ये पाठीच्या कण्याला मुद्दाम अतिशय तीव्र असा ताण दिला जातो.
पध्दती
१. ताडासनात उभे रहा. (चित्र क्र. १) गुडघे घट्ट आवळलेले असू द्या.
२. श्वास सोडा. पुढे वाका आणि बोटे जमिनीवर टेकवा. पावलांच्या बाजूला, चवड्यांच्या जरा मागे तळहात टेका. गुडघे वाकवू नका. (चित्र क्र. ४७)
३. डोके वर उचलून धरा आणि पाठ ताण. पाय जमिनीशी काटकोन करतील अशा बेताने पुठ्ठा जरा पुढे डोक्याकडे आणा.
४. या स्थितीत राहून दोनदा दीर्घ श्वसन करा.
५. श्वास सोडा. धड पायांच्या जरा नजीक आणा; आणि डोके गुडघ्यांवर टेकवा. (चित्र क्र. ४८)
६. गुडघ्यावरील पकड सैल होऊ देऊ नका. परंतु गुडघ्यांच्या वाटया चांगल्या वर खेचून धरा. दीर्घ आणि समतोल श्वसन करीत या स्थितीत रहा.
७. श्वास घ्या. डोके गुडघ्यांवरुन उचला. परंतु तळहात जमिनीवर तसेच राहू द्या. (चित्र क्र. ४७)
८. दोनदा श्वसन केल्यावर एक दीर्घ श्वास घ्या. जमिनीवरुन हात उचला आणि पुन्हा ताडासनात या. (चित्र क्र. १).
परिणाम
या आसनामुळे पोटातील वेदना थांबतात आणि यकृत, प्लीहा व मूत्रपिंड ही सुधारतात. मासिक पाळीमध्ये पोटात होणार्या वेदना कमी होतात. हृदयाच्या ठोक्यांचा वेग संथ होतो. आणि पाठीच्या कण्यातील शिरांना नवजीवन मिळते. या आसनात दोन मिनिटे किंवा अधिक काळ राहिले तर मनाची खिन्नता नाहीशी होते. या आसनामुळे मेदूंमधील पेशी शांत होतात. त्यामुळे झटकन उत्तेजित होणार्या व्यक्तींना यापासून लाभ होतो. हे आसन केल्यानंतर शरीर व मनाला शांतता आणि शीतलता लाभतात. डोळे तेजाळतात आणि मनाला शांती लाभते. शीर्षासन (चित्र क्र. १८४) करताना ज्यांचे डोके जड होते; चेहरा लाल होतो किंवा इतर कसला त्रास होऊ लागतो त्यांनी प्रथम उत्तासनात करावे म्हणजे मग शीर्षासन त्यांना सहजपणे करता येईल.
N/A
References : N/A
Last Updated : September 08, 2020
TOP