मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
हंसासन *

हंसासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३५६)
हे आसन मयूरासनासारखेच (चित्र क्र. ३५४) आहे. फक्त हात टेकण्याची पध्दत वेगळी आहे. मयूरासनामध्ये करंगळ्या एकमेकीशी जुळलेल्या असतात आणि बोटे पायांवर रोखलेली असतात. उलट हंसासनामध्ये आंगठे जुळतील आणि बोटे डोक्याकडे रोखली जातील, अशा तर्‍हेने हात टेकले जातात. आधुनिक व्यायामपध्दतीमधील ‘प्लँट बँलन्स’ या प्रकाराशी या आसनाचे साम्य आहे.

पध्दती
१. जमिनीवर गुडघे टेका. गुडघ्यांमध्ये किंचित अंतर असू द्या.
२. पुढे वाका आणि तळहात जमिनीवर टेका. आंगठे एकमेकाशी जुळलेले असू द्या. बोटे पुढे रोखलेली असू द्या.
३. कोपरे वाकवा. आणि कोपरांपुढील हात जुळवून ठेवा. छाती व पोट यांमधील पडदा कोपरांवर टेका, तसेच छाती दंडांच्या मागच्या बाजूवर टेका.
४. पाय आधी एक आणि नंतर एक याप्रमाणे लांबवा आणि ते जुळलेले ठेवा.
५. श्वास सोडा. धड पुढच्या बाजूला झुकवा. शरीराचा भार मनगटे आणि हातांचे पंजे यांवर ठेवा. पाय जमिनीवरुन उचला आणि ते सरळ वर ताणलेले ठेवा. पावले जुळलेली असू द्या आणि पाय जमिनीशी समांतर राहू द्या. (चित्र क्र. ३५६)
६. श्वास न थांबवता शक्य तितका अधिक वेळ तोल सांभाळून राहा. हातांच्या विशिष्ट स्थितीमुळे मनगटांवर अधिक भार येईल आणि त्यामुळे कोपरांपासून पुढील हात जमिनीशी काटकोन करुन राहाणार नाहीत. मयूरासनातल्यापेक्षा हंसासनामध्ये तोल सावरणे अधिक कठीण असते. छाती व पोट यांमधील पडद्यावर दाब येत असल्यामुळे श्वसन कष्टाचे होईल. मयूरासनातल्याप्रमाणे कोपरापासून पुढल्या हातांवर शरीराचा भार येत नाही.
७. श्वास सोडा आणि पायाचे आंगठे व डोके जमिनीवर टेका. गुडघे हातांच्या शेजारी जमिनीवर टेका. कोपरांवरुन शरीराचा भार काढून घ्या. हात आणि डोके जमिनीवरुन उचला आणि विसावा घ्या.

परिणाम
या आसनामुळे शरीराचा पोटातला भाग सुधारतो, कारण पोटातील रक्तवाहिन्यांवर कोपरांचा दाब येत असल्यामुळे पोटातील अवयवांमध्ये रक्ताभिसरण योग्य तर्‍हेने होऊ लागते. त्यामुळे पचनशक्ती वाढते व शरीरयंत्रणेमध्ये विषद्रव्ये साचण्यास प्रतिबंध होतो. या आसनामुळे कोपरे, कोपरापुढील हात आणि मनगटे विकसित होतात आणि मजबूत बनतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP