भेकासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(यालाच मंडूकासन असेही म्हणतात)
(चित्र क्र. १००)
भेक म्हणजे बेडूक. या आसनातील कृती बेडकाप्रमाणे दिसते म्हणून हे नाव पडले आहे.
पध्दती
१. तोंड जमिनीकडे करुन पाय लांब करुन पालथे झोपा. हात मागच्या दिशेला लांबवा.
२. श्वास सोडा. गुढगे वाकवा आणि टाचा पुठ्ठ्याकडे आणा. उजव्या पायाचा चवडा उजव्या हाताने पकडा. डाव्या पायाचा चवडा डाव्या हाताने पकडा. (चित्र क्र. ९८) दोनदा श्वसन करा. श्वास सोडा. डोके आणि धड जमिनीपासून उचला आणि वर पहा.
३. आता पावलांच्या वरच्या भागाला तळहाताचा स्पर्श होईल अशा तर्हेने हात वळवा आणि पायाची व हाताची बोटे डोक्याकडे रोखलेली असू द्या. (चित्र क्र. ९९) खालच्या दिशेने हात लांबवा. आणि पायाची बोटे व टाचा जमिनीच्या अधिक जवळ आणा. मनगटापासून कोपरापर्यंतचे हात जमिनीशी काटकोन करुन ठेवा. (चित्र क्र. १००) गुडघे आणि घोटे यांमध्ये लवचिकपणा आला म्हणजे टाचा जमिनीला लावणे शक्य होऊ लागते.
४. या स्थितीमध्ये १५ ते ३० सेकंद रहा. परंतु श्वास रोखून धरु नका श्वास सोडा, पावलांपासून तळहात मोकळे करा. पाया लांब करा. विसावा घ्या.
परिणाम
पोटातील स्नायू या आसनात जमिनीवर दाबले जात असल्यामुळे त्यांमध्ये सुधारणा होते. गुडघे मजबूत बनतात आणि संधिवात किंवा वातरोग यांमुळे गुडघ्यांच्या सांध्यांमध्ये असलेले दुखणे नाहीसे होते. गुडघ्याच्या सांध्यांमध्ये काही अंतर्गत विस्थापन झाले असेल तर त्यातही या आसनामुळे सुधारणा होते. पावलांवर हातांचा जो दाब पडतो त्यामुळे तळपायांचा सपाटपणा नाहीसा होऊन त्यांमध्ये योग्य ती कमान निर्माण होते. घोटयांमधील लचक यामुळे नाहीशी होऊन घोटे सुदृढ बनतात. या आसनामुळे टाचांमधील कळा नाहीशा होतात. हे आसन सातत्याने केल्यास टाचांचा ताठरपणा कमी होऊन त्या मऊ बनतात. वीरासनाप्रमाणेच (चित्र क्र. ८९) या आसनानेही टाचांमधील वाढलेली हाडे बरी होतात.
N/A
References : N/A
Last Updated : September 09, 2020
TOP