सालंब शीर्षासन ३ *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. १९४ आणि १९५)
पध्दती
१. सतरंजीजवळ गुडघे टेका. गुडघे एकमेकापासून एक फूट अंतरावर ठेवा.
२. तळहात उताणे करा. आणि ते गुडघ्याच्या मध्ये, बोटे पावलांकडे रोखून सतरंजीवर ठेवा. मनगटापासून कोपरांपर्यंतचे हात जमिनीशी काटकोनात आणि एकमेकांशी समांतर ठेवावेत. तळहातांमधील अंतर खांद्यांमधील अंतरापेक्षा अधिक असू नये.
३. मनगटांच्या पाठीमागे लगतच सतरंजीवर टाळू टेका. त्यामुळे कपाळ मनगटांच्या आतल्या बाजूच्या समोर येईल. डोके दोन पंज्यांच्या बरोबर मध्यावर ठेवावे. त्यामुळे टाळू जमिनीवरील दोन तळहातांपासून सारख्याच अंतरावर राहील.
४. मनगटे आणि तळहात जमिनीवर जोराने दाबा. श्वास सोडा. पावले जमिनीवरुन उचला. पाय वर उचलून काटकोनात न्य आणि शरीर तोलून धरा. कोपरे रुंदावू नका, उलट ती जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करा. (चित्र क्र. १९३)
५. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत एक मिनिट राहा. मग श्वास सोडा व हलके हलके पाय खाली जमिनीवर आणा.
६. शीर्षासनाच्या या प्रकारात तोल सांभाळता येऊ लागला म्हणजे हात एकमेकांच्या शक्य तितके जवळ आणण्याचा प्रयत्न करा. कालांतराने तळहाताच्या बाजू आणि करंगळ्या एकमेकांना स्पर्शू लागल्या पाहिजेत. (पुढील दृश्य : चित्र क्र. १९४; बाजूचे दृश्य : चित्र क्र. १९५). पाय गुडघ्याशी न वाकवता ताठ ठेवून वर जाण्यास आणि खाली येण्यास शिका. (चित्र क्र. १९६ आणि १९७). शीर्षासनाच्या या प्रकारामुळे अधिक स्थिरपणे आणि आत्मविश्वासाने तोल सांभाळता येऊ लागतो.
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2020
TOP