भारद्वाजासन २ *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. २९९ आणि ३००)
पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. डावा पाय गुडघ्याशी वाकवा. डावे पाऊल हातांनी पकडून ते उजव्या मांडीच्या मुळाशी ओटीपोटाजवळ ठेवा. म्हणजे डाव्या पायाची टाच बेंबीजवळ येईल. डावा पाय अशा तर्हेने अर्धपद्मासन राहील.
३. उजवा पाय गुडघ्याशी वाकवा आणि उजवे पाऊल मागे आणून उजवी टाच उजव्या कंबरेजवळ टेकवा. उजव्या पोटरीची आतली बाजू उजव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूला लगटून राहील. दोन्ही गुडघे जमिनीवर एकमेकाशी ठेवा.
४. श्वास सोडा. डावा हात खांद्यापासून पाठीमागे न्या. डावे कोपर वाकवा. डावा हात उजव्या पुट्ठाजवळ आणा आणि डाव्या हाताने डावे पाऊल पकडा.
५. उजवा हात ताठ करा. डाव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूवर डाव्या गुडघ्यापाशी उजवा हात ठेवा. तो हात डाव्या गुडघ्याच्या खाली सरकवा. तळहात जमिनीवर टेकलेला आणि बोटे उजवीकडे रोखलेली असू द्या. (चित्र क्र. २९९ व ३००)
६. डावा पाय घट्ट धरा. आणि धड डावीकडे शक्य तितके अधिक प्रमाणात वळवा. मान अनुक्रमे दोन्ही बाजूंना वळवून खांद्यावरुन नजर पलीकडे रोखा.
७. नेहमीप्रमाणे किंवा दीर्घ श्वसन करीत अर्धे ते एक मिनिट या स्थितीत राहा.
८. पूर्वस्थितीत या आणि आधीच्या इतकाच वेळ ते दुसर्या बाजूने करा. आता उजवे पाऊल डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवा आणि ते उजव्या हाताने पाठीच्या मागून धरुन ठेवा. डावा पाय गुडघ्याशी वाकवा आणि डावी टाच डाव्या पुठ्ठयापाशी जमिनीवर टेका. डावा हात उजव्या गुडघ्याच्या खाली ठेवा आणि धड शक्य तितके अधिक उजवीकडे वळवा.
९. आसन दोन्ही बाजूंकडून पूर्ण झाल्यानंतर पाय ताठ करा. हात लांब करा आणि विसावा घ्या.
परिणाम
हे आसन केल्यामुळे गुडघे आणि खांदे लवचिक बनतात. ज्यांच्या पाठीच्या कण्याच्या हालचाली चपलतेने होऊ शकतात, त्यांच्या दृष्टीने हे आसन फारसे परिणामकारक नाही. परंतु आर्थरायटिसचा विकार असलेल्यांना मात्र हे आसन म्हणजे वरदानच होय.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP