मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
एकपाद शीर्षासन *

एकपाद शीर्षासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३७१)
एकपाद म्हणजे एक पाय. शीर्ष म्हणजे डोके.

पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. गुडघा वाकवा. डावे पाऊल उचला आणि डावा घोटा दोन्ही हातांनी धरुन ते पाऊल धडाजवळ आणा. (चित्र क्र. ३६९)
३. श्वास सोडा. डावी मांडी वर उचलून मागे न्या. धड किंचित पुढे वाकवा आणि डावा पाय मानेच्या मागच्या बाजूवर ठेवा. (चित्र क्र. ३७०) डाव्या पायाच्या खालच्या भागाची बाहेरची, घोटयाच्या वर अगदी लगतची बाजू मानेच्या मागच्या बाजूला स्पर्श करील.
४. मान व डोके वर उचला. पाठ ताठ ठेवा. डावा घोटा मोकळा सोडा. छातीसमोर तळहात जुळवा. (चित्र क्र. ३७१) डाव्या मांडीची मागची बाजू आता डाव्या खांद्याच्या मागच्या बाजूला स्पर्श करील. डोके जर योग्य तर्‍हेने उचलून धरले नाही तर पाय मानेवरुन घसरेल. उजवा पाय जमिनीवर सरळ व ताठ ठेवावा. संपूर्ण पायाची मागची बाजू जमिनीला चिकटून राहावी. बोटे पुढे रोखलेली असावी.
५. दीर्घ श्वसन करीत या स्थितीत १५ ते ६० सेकंद राहा.
६. तळहात मोकळे करा. दोन्ही हातांनी डावा घोटा पकडा. डावा पाय जमिनीवर आणा आणि तो सरळ करा.
७. उजवा पाय मानेच्या पाठीमागे ठेवून हे आसन उजव्या बाजूने पुन्हा करा. डावा पाय जमिनीवर सरळ व ताठ ठेवावा. दोन्ही बाजूंकडील आसनांना सारखाच वेळ द्यावा.

परिणाम
या आसनाच्या अभ्यासामुळे मान आणि पाठ मजबूत बनतात. तसेच मांडया व गुडघ्यांमागील स्नायू पूर्णपणे ताणले जातात. पोटातील अवयव आकुंचन पावतात व पचनशक्ती वाढते. हे आसन करु लागण्यापूर्वी, मानेवर ठेवलेल्या पायाचा भार आणि दाब किती असतो, याची जाणीव आपल्याला नसते.

एकपाद शीर्षासन चक्र
पुढे दिलेली आसने ही एकपाद शीर्षासनाचे पुढचे टप्पे (चित्र क्र. ३७१) म्हणून एकामागून एक अशी अखंडितपणे करता येतील. ती पृथकपणे वेगवेगळी करण्याची गरज नाही. प्रथम एक पाय मानेच्या पाठीमागे ठेवून एकपाद शीर्षासनापासून प्रारंभ करुन सर्व आसन चक्र पूर्ण करावे; नंतर एक दोन मिनिटे विश्रांती घ्यावी आणि दुसरा पाय मानेच्या पाठीमागे ठेवून सर्व चक्राची पुनरावृत्ती करावी. ही आसने अतिशय कष्टाची आहेत आणि त्यांच्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी दीर्घ काळ सरावाची आवश्यकता असते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP