पूर्वोत्तानासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. १७१)
पूर्व या शब्दाचा मूळ अर्थ पूर्व दिशा. शिवाय पूर्व म्हणजे कपाळापासून पायाच्या आंगठयापर्यंत सर्व शरीराची पुढली बाजू. उत्तान म्हणजे तीव्र असा ताण. या आसनामध्ये शरीराची सगळी पुढली बाजू ताणली जाते.
पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. तळहात कंबरेनजीक जमिनीवर टेका. हाताची बोटे पायाच्या दिशेने रोखलेली असू द्या. (चित्र क्र. ७७)
२. गुडघे वाकवा आणि टाचा व चवडे जमिनीवर टेकवा.
३. शरीराचा भार हात आणि पाय यांवर टाका. श्वास सोडा आणि शरीर जमिनीवरुन वर उचला. हात आणि पाय ताठ करा व गुडघे आणि कोपरे घट्ट आवळलेली असू द्या. (चित्र क्र. १७१)
४. मनगटापासून खांद्यापर्यंतचे हात जमिनीशी काटकोन करतील आणि खांद्यांपासून ओटीपोटापर्यंतचे धड जमिनीशी समांतर असेल.
५. मान ताणा आणि डोके मागच्या बाजूला शक्य तितके अधिक झुकवा.
६. नेहमीसारखे श्वसन करीत या स्थितीत एक मिनिट राहा.
७. श्वास सोडा. कोपरे आणि गुडघे वाकवा, शरीर खाली आणून जमिनीवर बसा आणि विसावा घ्या.
परिणाम
या आसनामुळे मनगटे व घोटे सशक्त बनतात. खांद्यांच्या सांध्यांची हालचाल सुधारते. आणि छातीचा पूर्ण विकास होतो. पुढे वाकून करण्याच्या इतर कठीण आसनांमुळे येणारा थकवा या आसनामुळे नाहीसा होतो.
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2020
TOP