मरीचासन १
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. १४४)
या आसनात ब्रह्मदेवाचा मुलगा जो मरीची ऋषी, त्याचे नाव दिले आहे. मरीची हा सूर्याचा आजोबा.
पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. डावा गुडघा वाकवा आणि डाव्या पायाचा चवडा व टाच जमिनीवर टेका. डाव्या पायाची नडगी जमिनीशी काटकोनात असू द्या. आणि पोटरी मांडीला लगटून ठेवा. डाव्या पायाचा टाच शिवणीजवळ ठेवा. डाव्या पावलाची आतली बाजू ही लांबवलेल्या उजव्या मांडीच्या आतल्या बाजूला लगटून ठेवा.
३. डावा खांदा पुढल्या बाजूला ताणा. डावी बगल काटकोनात असलेल्या डाव्या नडगीला स्पर्शेपर्यंत डावी नडगी आणि मांडी यांच्याभोवती डावा हात वेढा. डावे कोपर वाकवा. आणि डावे कोपर व मनगट यांमधील भाग पाठीमागच्या बाजूला कंबरेच्या पातळीला न्या. नंतर उजवा हात पाठीमागे न्या आणि उजव्या हाताने डावे मनगट किंवा डाव्या हाताने उजवे मनगट पकडा. हे शक्य नसेल तर दोन हातांचे पंजे किंवा बोटे धरा. (चित्र क्र. १४३)
४. आता पाठीचा कणा डावीकडे वळवा. लांबवलेला उजवा पाय ताठ ठेवा. लांबवलेल्या उजव्या पायाच्या आंगठयावर नजर खिळवून या स्थितीत राहा आणि काही वेळा दीर्घ श्वसन करा.
५. श्वास सोडा आणि पुढे वाका. प्रथम कपाळ, नंतर ओठ व शेवटी हनुवटी उजव्या गुडघ्यावर टेका. (चित्र क्र. १४४) या स्थितीत असताना दोन्ही खांदे जमिनीशी समांतर ठेवा. आणि नेहमीसारखे श्वसन करा. या स्थितीमध्ये सुमारे ३० सेकंद राहा. आणि सर्व वेळ लांबवलेल्या पायाची मागची बाजू जमिनीला टेकून ठेवण्याची काळजी घ्या.
६. श्वास घ्या. उजव्या गुडघ्यावरुन डोके उचला. (चित्र क्र. १४३) हात मोकळे करा. डावा पाय सरळ करा. आणि स्थिती क्र. १ वर या.
७. हे आसन उलटया बाजूने पुन्हा करा. आणि दोन्ही बाजूंकडील आसनांना सारखाच वेळ द्या.
परिणाम
या आसनाच्या सरावामुळे बोटांची शक्ती वाढते. आधी सांगितलेल्या [जानुशीर्षासन (चित्र क्र. १२७), अर्धबध्दपद्म पश्चिमोत्तानासन (चित्र क्र. १३५) आणि त्र्यंगमुखैकपाद पश्चिमोत्तानासन (चित्र क्र. १३९) ] या आसनांमध्ये एक पाय दोन्ही हातांनी पकडून पोटातील अवयव आकुंचित केले जातात. या आसनामध्ये हातांनी पाय पकडले जात नाहीत. परंतु पुढे वाकून लांबवलेल्या पायावर हनुवटी टेकण्यामुळे पोटातील अवयव अतिशय जोराने आकुंचित केले जातात. या आसनामध्ये हातांनी पाय पकडले जात नाहीत. परंतु पुढे वाकून लांबवलेल्या पायावर हनुवटी टेकण्यामुळे पोटातील अवयव अतिशय जोराने आकुंचित केले जातात. यामुळे पोटातील अवयवांमध्ये रक्ताभिसरण अधिक चांगल्या रीतीने होऊ लागते. व त्यामुळे हे अवयव निरोगी बनतात. सुरवातेला पाठीमागच्या बाजूला एका हाताने दुसरा हात पकडून पुढे वाकणे अतिशय कठीण वाटते, परंतु सरावाने ते जमू लागते. पाठीच्या कण्याच्या छातीमागच्या भागाला या आसनामुळे व्यायाम घडतो.
टीप : पश्चिमोत्तानासन (चित्र क्र. १६१) योग्य तर्हेने करता यावे यासाठी जानुशीर्षासन, अर्ध बध्द पद्म पश्चिमोत्तानासन, त्र्यंगमुखैकपाद पश्चिमोत्तानासन आणि मरीच्यासन १ ही चार आसने पूर्वतयारीची आसने आहेत. पश्चिमोत्तानासनामध्ये (चित्र क्र. १६०) कित्येकदा प्रयत्न करुनही पावलांवर घट्ट पकड मिळविणे अनेकांना कठीण जाते. या चार आसनांमुळे पाठ आणि पाय यांमध्ये लवचिकपणा येतो. आणि पुढे वर्णन केलेले पश्चिमोत्तानासन (चित्र क्र. १६१) हळू हळू अचूकपणे जमू लागते. एकदा हे सहजपणे जमू लागले म्हणजे वर उल्लेखिलेली चार आसने रोज करण्याऐवजी आठवडयातून एकदा किंवा दोनदा केली तरी चालतात.
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2020
TOP