परिपूर्ण मत्स्येंद्रासन **
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ३३६ व ३३९)
परिपूर्ण म्हणजे सबंध किंवा संपूर्ण. मत्स्येंद्र हा हठविद्येचा एक प्रवर्तक होता. ‘हठयोग प्रदीपिके’ च्या २७ व्या श्लोकात म्हटले आहे, "मत्स्येंद्रासनामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो. त्यामुळे भूक वाढते व शरीरातील भयंकर रोगांचा नाश होतो. याच्या अभ्यासामुळे कुंडलिनी जागृत होते आणि चंद्र स्थिर होतो.” असे म्हणतात की उजव्या नाकपुडीतील श्वास उष्ण असतो व डाव्या नाकपुडीतील श्वास थंड असतो. म्हणूनच उजव्या नाकपुडीतील श्वासाला सूर्य-प्राण आणि उजव्या नाडीला पिंगला (अग्नीच्या रंगाची) असे म्हटले जाते. तसेच डाव्या नाकपुडीतील श्वासाला चंद्र-प्राण आणि डाव्या नाडीला ईश असे म्हटले जाते. ईडेमधून प्रवास करणारा चंद्र सबंध शरीरयंत्रणेमध्ये अमृताचे शिंपण करतो आणि पिंगलेमधून फिरणारा सूर्य सबंध शरीरयंत्रणा कोरडी करतो. मानवी शरीर ही विश्वाची छोटी प्रतिकृती मानली जाते. असे म्हणतात की आटाळ्याच्या मुळाशी चंद्राचे स्थान आहे आणि या चंद्रस्थानामधून सतत झरत असणारे हे शीतल अमृत जठराग्नी प्रदीप्त ठेवताना नष्ट होत असते. मत्स्येंद्रासनामुळे याला प्रतिबंध होतो. हठविद्येचा प्रवर्तक जो मत्स्येंद्र त्याचे नाव या आसनाला दिले आहे.
पध्दती
१. पाय सरळ समोर पसरून जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. उजवा गुडघा वाकवा आणि उजवे पाऊल डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवा.
उजवी टाच बेंबीवर दाबलेली असू द्या. डावा गुडघा वाकवा आणि तो छातीजवळ आणा.
३. श्वास सोडा. धड डावीकडे वळवा. डावा हात खांद्यापासून पाठीच्या मागे नेऊन डाव्या हाताने उजवा घोटा पाठीच्या मागे पकडा. (चित्र क्र. ३३४) घोटयावरील पकड घट्ट असू द्या. येथे आसनाचा पहिला टप्पा संपतो.
४. डावे पाऊल उचलून उजव्या मांडीवर न्या आणि उजव्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूपाशी ते जमिनीवर टेका (चित्र क्र. ३३५). काही वेळा श्वास घ्या. हा आसनाचा दुसरा टप्पा.
५. पुन्हा श्वास सोडा. धड डावीकडे वळवून उजवा खांदा डाव्या गुडघ्यावर आणा आणि उजव्या हाताने डावे पाऊल पकडा. मान छातीकडे वळवा हनुवटी उचला आणि वर दृष्टी लावा. (चित्र क्र. ३३६) हा आसनाचा अखेरचा टप्पा. तुमच्या क्षमतेप्रमाणे या स्थितीत ३० ते ६० सेकंद राहा. छाती व पोट यांमधील पडद्यावर दाब आल्यामुळे श्वास जलद होऊ लागेल.
६. प्रथम डाव्या पावलावरील पकड सैल करा. ते उचलून उजव्या मांडीवरुन अलीकडे आणा आणि डावा पाय सरळ लांबवा. त्यानंतर उजव्या घोटयावरील पकड सोडा. उजवा पाय सरळ लांबवा आणि विसावा घ्या.
७. या आसनात पाठीचा कणा पराकाष्ठेचा मुरडला जातो, त्यामुळे सर्व हालचाली श्वास सोडून केल्यास हे आसन सोपे जाते. हे आसन दुसर्या बाजूने करताना पुढील पध्दती अनुसरावी.
१. पाय सरळ पसरुन जमिनीवर बसा. डावा गुडघा वाकवा आणि डावे पाऊल उजव्या मांडीच्या मुळाशी ठेवा. डावी टाच बेंबीवर दाबलेली असू द्या.
२. श्वास सोडा. धड उजवीकडे वळवा. उजवा हात खांद्यापासून मागे झुकवा. उजव्या हाताने पाठीमागून डाव्या पायाचा घोटा घट्ट पकडा आणि उजवा पाय वाकवून वर घ्या. (चित्र क्र. ३३७) हा पहिला टप्पा.
३. उजवे पाऊल उचलून डाव्या जमिनीवरुन पलीकडे न्या, व ते डाव्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूपाशी जमिनीवर टेकवा. (चित्र क्र. ३३८). काही वेळा श्वास सोडा. हा आसनाचा दुसरा टप्पा.
४. पुन्हा श्वास सोडा. धड उजवीकडे वळवून डावा खांदा उजव्या गुडघ्यावर आणा आणि डाव्या हाताने उजवे पाऊल धरा. मान उजवीकडे वळवा. हनुवटी वर करा आणि दृष्टी वर लावा. (चित्र क्र. ३३९) हा शेवटचा टप्पा. या बाजूकडील स्थितीत आधीच्या इतकाच वेळ राहा.
५. उजव्या पावलावरील पकड सोडा. ते उचलून डाव्या मांडीवरुन अलीकडे आणा आणि उजवा पाय सरळ समोर लांबवा. त्यानंतर डाव्या घोटयावरील पकड सैल करा. डावा पाय सरळ लांबवा व विसावा घ्या.
परिणाम
पाठीच्या कण्याच्या या अतिशय कठीण अशा दोन्ही बाजूकडील मुरडीमुळे पाठीच्या कण्यातील मज्जांना रक्ताचा भरपूर पुरवठा केला जातो. या आसनामुळे जठरातील हालचाल वाढते व अन्नपचन आणि विषद्रव्यांचा निचरा यांना त्याची मदत होते. पाठीचा कणा आणि पोट निरोगी राहात असल्यामुळे शरीर आणि मन यांची शांती अढळ राहाते. पाठीच्या कण्याला या आसनात दोन्ही बाजूंना पराकाष्ठेची मुरड दिली जाते.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP