सुप्त वीरासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ९६)
सुप्त म्हणजे निजलेला. या आसनामध्ये जमिनीवर पालथे झोपून डोक्याच्या मागे हात लांबवायचे असतात.
पध्दती
१. वीरासनामध्ये बसा. (चित्र क्र. ८९)
२. श्वास सोडा. धड पाठीमागे झुकवा आणि प्रथम एक कोपर आणि नंतर दुसरे कोपर जमिनीवर टेकवा. (चित्र क्र. ९३)
३. हात लांबवून प्रथम एक कोपरावरील आणि नंतर दुसर्या कोपरावरील भार हलका करा.
४. प्रथम टाळू जमिनीवर टेका. (चित्र क्र. ९४) हळूहळू डोक्याची मागची बाजू आणि नंतर पाठ जमिनीवर टेकवा. (चित्र क्र. ९५) हात डोक्यावरुन पलीकडे न्या आणि सरळ मागे पसरा. (चित्र क्र. ९६) दीर्घ श्वसन करीत या स्थितीत शक्य तितका अधिक वेळ राहा. मग हात धडाच्या शेजारी ठेवा. कोपरे जमिनीवर दाबा आणि श्वास सोडून पुन्हा बसा.
५. हात डोक्यावरुन पलीकडे ताणावे किंवा मांडयाच्या जवळ ठेवावे. डोक्यावरुन पलीकडे हात ताणलेले असताना खांद्याची पाती जमिनीवरुन उचलू नयेत.
६. नवशिक्यांनी गुडघे एकमेकांपासून दूर ठेवले तरी चालतील.
परिणाम
या आसनामुळे पोटातील अवयव आणि ओटीपोटाचा भाग ताणला जातो. ज्यांच्या पायामध्ये कळा येतात, अशा व्यक्तींना १० ते १५ मिनिटे हे आसन केल्यामुळे आराम वाटेल. व्यायामप्रेमी व्यक्ती आणि ज्यांना दीर्घकाळ चालावे किंवा उभे राहावे लागते अशा व्यक्ती यांना हे आसन उपयुक्त आहे. हे जेवणानंतर करता येते आणि रात्री झोपण्यापूर्वी हे आसन केले तर दुसर्या दिवशी सकाळी पायांचा थकवा गेलेला आढळतो. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (N.D.A.) विद्यार्थी असलेले माझे अनेक शिष्य दीर्घ अंतरांचे संचलन केल्यावर हे आसन, सर्वांगासन (१) शी (चित्र क्र. २२३) जोडून करीत आणि त्यामुळे त्यांना अतिशय आराम वाटे.
N/A
References : N/A
Last Updated : September 09, 2020
TOP