मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
अनंतासन *

अनंतासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. २९०)
अनंत हे विष्णूचे एक नाव आहे. त्याचप्रमाणे विष्णूची शय्या बनलेल्या शेष या नागाचेही नाव आहे. हिंदू पुराणांत असे सांगितले आहे की क्षीरसागरामध्ये हजार फणा असलेल्या शेषावर विष्णू पहुडलेला असतो. तो निद्रेत असतानाच त्याच्या नाभीमधून एक कमळ उमलते. या कमळातून विश्वनिर्मिती करणारा ब्रह्मदेव निर्माण होतो. विश्वनिर्मिती झाल्यावर विष्णूला जागृती येते आणि तो वैकुंठ या सर्वात श्रेष्ठ स्वर्गातून विश्वाचे राज्य करतो. दक्षिण हिंदुस्थानामध्ये त्रिवेंद्रम येथे अनंतपद्मनाभाचे देवालय आहे, तेथे हे आसन दिसते.

पध्दती
१. सरळ उताणे झोपा. (चित्र क्र. २१९). श्वास सोडा. डाव्या कुशीवर वळा आणि डावी बाजू जमिनीला टेकलेली ठेवा.
२. डोके उचला. डावा हात डोक्याच्या पलिकडे नेऊन शरीराच्या रेषेत लांबवा. डावे कोपर वाकवा. कोपरापासून हाताच्या पंज्यापर्यंत वर उचला आणि डावा तळहात कानाच्या वरच्या बाजूला ठेवून त्यावर डोके टेका. (चित्र क्र. २८८) या स्थितीत नेहमीसारखे किंवा दीर्घ श्वसन करीत काही सेकंद राहा.
३. उजवा गुडघा वाकवा आणि उजव्या हाताचा आंगठा व पहिली दोन बोटे यांनी उजव्या पायाचा आंगठा पकडा. (चित्र क्र. २८९).
४. श्वास सोडा. उजवा हात आणि पाय एकदम वर उचला. (चित्र क्र. २९०). नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत १५ ते २० सेकंद राहा.
५. श्वास सोडा. उजवा गुडघा वाकवा आणि क्र. २ मध्ये वर्णन केलेल्या स्थितीत परत या.
६. डाव्या तळहातावरुन डोके जमिनीवर आणा आणि डाव्या कुशीवरुन वळून पुन्हा उताणे निजा. (चित्र क्र. २१९)
७. हे आसन आधीच्या इतकाच वेळ दुसर्‍या कुशीवर वळून करा आणि विसावा घ्या.

परिणाम
या व्यायामामुळे ओटीपोटाचा भाग सुधारतो आणि गुडघ्यापाठीमागच्या जोडशिरा योग्य तर्‍हेने विकसित होतात. या आसनामुळे पाठदुखीपासून आराम मिळतो आणि अंतर्गळाची वाढ थांबते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP