जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें । साद्य परिसिलें तुह्मीं संतीं ॥१॥
अहो ज्ञानदेवा असावें तुह्मा ठावें । येणें काय लहाणीव आणिली आह्मां ॥२॥
माझी मज आण सांगतें प्रमाण । सेवितें चरण तुझे स्वामी ॥३॥
जनीचे हो बोल स्वानंदाचे डोल । स्वात्ममुखीं बोल दुणावती ॥४॥
शुद्ध सत्त्व कागद नित्य करी शाई । अखंडित लिही जनीपाशीं ॥५॥
हांसोनी ज्ञानदेवें पिटियेली टाळी । जयजयकार सकळीं केला थोर ॥६॥