ऋषि ह्मणती धर्मदेवा । आमचा आशिर्वाद घ्यावा ॥१॥
पांडवपालक गोविंद । तिहीं लोकीं गाजे ब्रिद ॥२॥
भक्तिभावें केला वश्य । हरि सांभाळी तयास ॥३॥
रात्रंदिवस तुह्मांपासीं । दुजा ठाव नाहीं त्यासी ॥४॥
देव द्रौपदीतें सांभाळी । उभा पाठीसी वनमाळी ॥५॥
वनीं सांभाळी पांडवांसी । सुदर्शन त्याजपाशीं ॥६॥
हरिभक्तिं जाहला ऋणी । म्हणे नामयाची जनी ॥७॥