वैष्णव तो एक इतर तीं सोंगें । ठसे देउनी अंगें चितारिती ॥१॥
जिचे योनि जन्मला तिसी दंडूं लागला । तीर्थरुप केला देशधडी ॥२॥
नाइकोनी ब्रह्मज्ञान जो का दुराचारी । अखंड द्वेष करी सज्जनांचा ॥३॥
विद्येच्या अभिमानें नाइके कीर्तन । पाखांडी हें म्हणे करिती काई ॥४॥
पंचरस पात्रा कांता हे बडविती । उद्धरलों ह्मणती आह्मी संत ॥५॥
कीर्तनाचा द्वेष करी तो चांडाळ । तयाचा विटाळ मातंगीसी ॥६॥
वैष्णव तो एक चोखामेळा महार । जनी म्हणे निर्धार केला संतीं ॥७॥