आंधळ्याची काठी । अडकली कवणें बेटीं ॥१॥
माझिये हरणी । गुंतलीस कोणे रानीं ॥२॥
मुकें मी पाडस । चुकलें भोवें पाहें वास ॥३॥
तुजवीण काय करुं । प्राण किती कंठीं धरूं ॥४॥
आतां जीव जाऊं पाहे । धांव घालीं माझे आये ॥५॥
माझी भेटवा जननी । संतां विनवी दासी जनी ॥६॥