कुंडल कृष्णाकांठीं नाहीं; पण घटकाभर त्याला तेथे नेलें आहे. त्या, वेळच्या गांवकर्यांचा थारेपालट आजच्या कुंडलकरांना दगदग देणार नाहीं, अशी आशा आहे. गांवठाणाच्या या हालचालीनें भूगोलाच्या भक्तांचीं थोडीची दिशाभूल झाल्यास एक आण्याच्या भूगोलपत्रकानें त्यांचें समाधान होण्यासारखें आहे.]
साक्या
[१]
मनांत माझ्या गुणगुणतें हें रसिका कोणी कांहीं ।
“ कृष्णाकांठीं कुंडल आतां पहिलें उरलें नाहीं ” ॥
नव्या भरानें जुन्या जिवाचें गाणें ह्रदवीं खवळे ।
फिरत्या भंवर्यावरी मनाच्या फेस भराभर उसळे ॥
उचंबळुनि येतील बोल ते उधळुनि देतों वरतीं ।
पढिकांची चतुराई सारी येथुनि झाली परती ॥
साधाभोळा मराठमोळा जोमदार घाटाचा ।
रानफुलांचा साज चढविला त्यास त्याच थाटाचा ॥
शाहीराच्या रसवंतीला भावमेटिचें लेणें ।
एकसुराच्या एकसराला बालेघाटी दाणे ॥
असेल रसिका. असलें कांहीं ऐकायाचा हेत ।
तरि ये; मनिंच्या मळ्यांत पिकलें हे शाळूचें शेत ॥
राखण करि त्या जीवासाठी डोळ्यांचा हा माळा ।
तुझी बाहुली बसवि त्यांत; मग गोफण मारी काळा ॥
गोफणगुंढा फाडुनि टाकी पडदा काळाचाही ।
तुटती धागे तीन शेंकडा उणेपुरे हे पाही ॥
शिवनेरीचा हिरा चमकतो दख्खनच्या दरवारीं ।
रायगडाचें तटभंदीचें कोंदण साजे भारी ॥
सह्याद्रीभर चमके त्याचा जित्या जिवाचा जोर ।
तेजानें बघ पाजळल्या त्या राई काळ्याभोर ॥
त्याच लकाक्रीमधें तळपत्या त्या एका राईंत ।
कृष्णाकांठीं कुंडल शिकवी मायलेंकरां प्रीत ॥
त्या राईंतिल सगळ्या वेली एकच गाणें गाती ।
त्या गाण्यांतिल प्रेमकहाणी---वेड लाविते म्हणती ॥
प्रीतीचें तें गाणें होतें; सहज लागल्या नादीं ।
कोणी येतां जातां त्यासी तेंच सांगती आघीं ॥
झूळझुळत्या वार्यावर त्यांचीं पानें हलतांनाही ।
गुणगुणती तों गाणें; त्यांना छंदच दुसरा नाहीं ॥
वार्याची धुघधुगी हलवि तरि वेली तें कुजबुजती ।
सोंसाव्याचा सूर लागला तरी तेंच ओरडती ॥
तुझ्यासारख्या रसिकासाठीं त्या तें गाणें रानीं ॥
कळ्याफुलांच्या वेलपत्तिनें लिहिती पानोपानीं ॥
चल, तें वाचुनि पहा एकदां बोलशील मग तूंही ।
“ कृष्णाकांठीं कुंडल आता पहिलें उरलें नाहीं ” ॥
[२]
चलाच रसिका, माझ्याखातर त्या राईंत फिराया ।
भलत्या वेळीं, भरल्या ठायीं, भलती मौज पहाया ॥
सह्याद्रीच्या कडेकपारी कोठें मोठे घाट ।
दरीपठारीं धुंडित जाणें भारी अवघड वाट ॥
तशांत पसरुनि रात्र आपुली काळी काळी काया ।
दक्षिण-उत्तर झांकुनि टाकी हिरवी डोंगरमाया ॥
थकाल वाटे रसिका ! माझ्या रसवंतीच्या राया !
मनासारखें मोल न मिळतां कष्टहि जातिल वाया ॥
परंतु आतां नकाच मागें परतूं इतक्यासाठीं ।
मायेखातर भटकलाच ना कान्हा यमुनाकांठीं ? ॥
बारामावळ देश तुम्हीहि पायाखालीं घाला ।
---पहा पुण्याहून कृष्णाकांठीं सहजासहजीं आला ॥
मार्गीं दिसल्या सह्यगिरीच्या चिमण्या चिमण्या वाळा ।
वाजवितांना फिरतां रानीं पायीं घुंगुखाळा ॥
भीमानामें इथें नांदते श्रीमती चंद्रभागा ।
पंडलिकाची मायमाउली श्रीमहाराष्ट्रगंगा ॥
साधी सुरती बाळजिवाची, डामडौलही नाहीं ।
बघून घ्या ही रसिका ! इकडे नाचे नीराबाई ॥
काळा दरिया काळोखाचा वरतीं भरून राही ।
काळ्या राईमधें खालती काळी कृष्णामाई ॥
काळोखाचें रान माजलें, चंदाराणी नाहीं ।
तिच्याच मागें पळे तिचा तो चंदेरी दरियाही ॥
जिकडे तिकडे काळीं रानें हमरंवानें खुलतीं ।
निळ्या चांदव्यालागी नुसतीं झालरमोतीं झुलतीं ॥
राईमधली हिरवळ आतां काळ्या रातीं कुठली ?
माथ्यावरची तशी कोंबळी रंगसभाही उठली ॥
निजली दुनिया, निजला वारा, नव्हतें हालत पान ।
लाख जिभांची बडबड थांवुनि निजलें सारें रान ॥
मिटुनि फुलांचे डोळे निजल्या वनदेवीच्या वाळा ।
उभीं झोंपती झाडें: त्यांचा उचलजागता चाळा ॥
कुठें कळकबेटांतुनि निघतां सुरांत वारा वाहे ।
निजली राई मधुनी मधुनी वाटे घोरत आहे ॥
क्रूर पशूंची बिनशब्दांची लपनीछपती चाल ।
तीं राईचीं हलतीं स्वप्नें भयाण बहु त्रेताल ॥
काळे बुंधे खालीं नुसते वरतीं पान दिसेना ।
ठाण मांडुनी जणूं ठाकली वेताळाची सेना ॥
त्यांतुनि चिमणे झरे चालतां झुळझुळ हळु करितात ।
भुताटकींतुनि जातां भिउनी रामनाम म्हणतात ॥
भयाण रानीं भयाण राई; भयाण जिकडे तिकडे ।
भयाण राणी भीति नांदते बांधुनि काळे वाडे ॥
म्हणति अप्सरा आकाशांतुनि दुरून बघतांनाही ।
“कृष्णाकांठीं कुंडल आतां पहिलें उरलें नाहीं ” ॥
थरथर कांपे वरती जी ती निळ्या रानची राणी ।
त्या तर इवल्या चिमण्या, परंतु देवहि पळति विमानीं ॥
“देवहि पळती विमानिं ” म्हणसी शाहीरा ! तें नीट
कोण सांग मग क्रुष्णाकांठीं देवाहुनि हा धीट ?
पहा दिसे ती काळोखांतहि हलती काळी काया ॥
खास नसे ही नुसती तुमच्या चपळ मनाची माया ॥
[ त्या दोन जिवांची गांठ पडल्यावर ती त्याला विचारते---]
“ कुठली दौलत या खांद्यावर मान ठेवुनि निजते ?
कुण्या कुळाचें नांव उजळितें तलवारीचें पातें ? ॥
कोण गडाचा उभा वुरुज हा बुरुज हा बांका बरकंदाज ?
कुणीं चढविला लाजत मुरकत देहावर हा साज ?” ॥
[तेव्हां तो सांगतो]
“ रायगडावर धनी आमुचा, त्याला विकली काया ।
या देहाला, नांव साजणी, ‘ रायबागचा राया’ ॥
शिवरायाच्या शब्दांसंगें नाचतसे तकदीर ।
दोरीपासुनि सुटलेला हा वार्यावरचा तीर ॥
मैदानावर बेलगाम कीं फिरे मोकळा वारू ।
भरदरियावर भरकटतां धरि फेर फिरंगी तारूं ॥
तलवारीच्या धोरवरतीं हा जीव बारगीर ।
भालफळावर दिलें टांगुनी हातांनीं तकदीर ॥
रायगडावर खडे पसरले शिवरायाच्या पायीं ।
हिरेमाणकें तीं; आम्हांला दुसरी दौलत नाहीं ॥
मैदानाचा सुभा मोकळा, दुनिया मातीमोल ।
जिवंत मुडदा दिला गाडुनी पाताळाहुनि खोल ॥
पळत्या पायावरचा इमला; हिरवा महाल माझा ।
रानगांवचे कांटे किल्ले; त्याच रानचा राजा ॥
एकमांड घोडयावर जाणें उत्तर हिंदुस्थानीं ।
भीमथडीला भाकर; तोंवर गंगथडीला पाणी ॥
जंगलशाही मिरास सारी, हिरवी दौलत न्यारी ।
रायबागच्या बादशहाची फिरते बेगम प्यारी ॥
होइल असतां बालीउम्मर सूरत ऐसी न्यारी ।
कुंडलवाली बादशहाची बाली बेगम प्यारी ॥
जयवंतीशीं लग्न लाविलें जेव्हां शिवरायांनीं ।
तोरणगाडें तैं तोरण बांधिति सार्या कुंडलकरणी ॥
[त्यानें मागें एकदां कुंडल प्रांतीं मुशाफरी केली. त्या वेळीं]
“ पायाखाली घालुनि थकलों कुंडलचें हें सदर ।
दूरदेशच्या मुशाफराची कुणी न केली कदर ”॥
“ एक जिवाविण सुनेंच तेव्हां कुंडलचें हें सदर ”॥
“ आला नव्हता”-“ काय साजणी ”?” नव्हता आला पदर ॥
गेल्या गोष्टी आज कशाला ? सोडा आतां राग ।
दूरदेशच्या मुशाफरा ! घ्या दिलादिलाचा वाग ” ॥
कां वेलींचीं पानें फिरलीं; फुलें लाजलीं कां हीं ? ॥
हांसलीस कां झाडावरतीं तूंही, मैनाबाई ? ॥
[तिनें ‘ बरोबर घेऊन चला ’ असा हट्ट धरला हट्ट धरला तेव्हां तो म्हणतो, व ती त्याला उत्तर देते-]
तुझ्या कपाळीं सुबक बसावी बघ मोत्यांची जाळी ।
करवंदीची कांटेजाळी, परी आमुच्या भाळीं ॥
रायगडावर उघडया पडल्या नव्या हिर्यांच्या खाणी ।
नटेल त्यांनीं रायबागच्या रायाजीची राणी ॥
टकमक टोंकावरी राहणें चढण उभी ती फार ।
पडेल खालीं बघतां असली नाजुक नवती नार ॥
प्रीतीच्या पंखांनीं येइल टाकुनि मागें गगना ॥
रायबागच्या राघूमगें ही मान्यांची मैना ॥
थंडीची हुडहुडी निवाली, सरता झाला माघ ।
रायगडावर जागा झाला जंगलांतला वाघ ॥
शहरगांवच्या हिरव्या फिरत्या पोरी चुकल्यावाणी ।
उजाड रानीं पडल्या तर त्या लागतील ना झुरणी ? ॥
चला विचारा त्या वाघाला, ‘कघीं लागली पाठीं ’ ।
तुझी रानची राणी कुंडलच्या बाजारासाठीं ? ॥
वाघाची किंकाळी मोंगल घोडयाची कीं टाप ।
ऐकुनि छातीवरच्या चोरा सुटेल ना थरकांप ॥
तरीच कां ही कमरेवरची नागिण इतकी रोड ? ।
रायबागच्या रणमर्दाची जन्माची जी जोड ॥
शिवनेरीच्या शिवरायांनीं हीच दिली कां शीक ? ।
रायबागचे राघू पढले पोपटपंची ठीक !
नाहीं कोणी फसावयाचें बोल असे ऐकुनिया !।
दुसरी खाही गाते आतां, अलम दरूखनी दुनिया ॥
[तरी तिचा निश्चय फिरविण्याकरितां तो सुचवितो-]
फसाल पुरत्या; असल्या गांठीं जन्माच्या ठरलेल्या ।
बनी बनाई बदलायाची नाहीं कांहीं केल्या ॥
“ तेंच सांगतें-जिवा जिवाच्या आतां नजरा जमल्या ।
बनी बनाई बदलायाची नाहीं कांहीं केल्या ”
[तिचा निरोप घेऊन स्वारींत गेला असतां---]
फुलांफुलांतुनि रंगत होतीं मधुर सुगंधी स्वप्नें ।
[झाडावरच्या मैनेला दूती करून---]
सखे, सवंगडी म्हणतिल ज्याला ‘ रानगांवचा राजा ’ ।
खूणगांठ ती, मैनाबाई-तोच शिपाई माझा ॥
तोच दिलाचा दोस्त, जिवाचा माझ्या मालक तोच ।
जें जें माझें त्याची त्याची झाली त्याला पोंच ॥
झाडावरचा राघू झाला जसा तुझा बेभान ।
तसाच राघू रायबागचा, कापी माझी माग ॥
वार्यावरतीं उडती फिरती असली मैनाराणी ।
तुझ्या गडयानें परी सोडितां झालिस बापुडवाणी ॥
आणिक जें जें सुचेल तें तें सांग साजणी बाई ।
पढवणूक ही मको, तुलाही कळतें सारें कांहीं ॥
भरकन गेली उडूनि मैना; उरे मराठी मैना ।
हुरहुर करुनी जीव भागला काय सांगणें दैना ! ॥
[ पुढें तो घायाळ होऊन मेला तेव्हां- ]
जीव सांडुनी पडला माझा जीवाचा अलबेला ।
तोंडीं माती पडुनि रंगला जोबनरसरंगेला ॥
शिवबांच्या शिरपेंचासाठीं-बोली ठरली होती- ।
तोडुनि मंगलसूत्र जिवाचीं देणें माणिकमोतीं ॥
शिवनेरीच्या शिवा, कसा हो केला माझा घात ?
हातावरचा राघू नेला उडवुनि हातोहात ॥
घारीनें झडपिला हातिंचा बघतां बघतां हार ।
पुढतीं केला हात जरा तों विरून गेली गार ॥
चुना लाविला पानाला तो अजुनि वाळला नाहीं ।
विडा घेतल्यावांचुनि केली कां हो इतकी घाई ?
असें जसेंच्या तसेंच वठलें जातें पाउल तुमचें ।
पाय काढिला इथून पुरता; पुन्हां न परतायाचें !॥
अखंड भरला नव रंगांनीं हा इष्काचा प्याला ।
दुनिया झुकती है ये हरदम, नहीं झुकानेवाला !॥
[संदर्भ न लागणार्या ओळी]
जशी रानच्या पत्रीसाठीं रुसे मंगळागौर ।
रुसा साजणी; फुलते गुलशन दिलेचमनकी और ॥
लपंडाव हा सरला, राया, राज्य तुम्हांवर आलें ।
हंसेल बाई या बोला ही साधीभोळी राई ।
“कृष्णाकांहीं कुंडल आतां पहिलें उरलें नाही ” ॥
[त्या शोकानें तिचा अंत झाल्यावर-]
ज्योत ज्योतिला मिलुनी गेली, माती मातीलाही ।
“कृष्णाकांठीं कुंडल आतां पहिलें उरलें नाहीं ” ॥