मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
खेळत होता बाळ आमुचा चेंडू...

राम गणेश गडकरी - खेळत होता बाळ आमुचा चेंडू...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


खेळत होता बाळ आमुचा चेंडू घेवोनी ॥

पाहत होतों आम्ही दोघे आनंदें वरुनी ॥

अडगळ होती भंवती परि तो लक्ष्य न दे तिकडे ॥

हांसे, धांवे, खेळे, उडवी चेंडू चोंहिकडे ॥

तन्मय होऊनि खेळत होता यापरि स्वच्छंदें ॥

पाहत होतों आम्ही त्यातें तशाच आनंदें ॥

पाहि तिकडे कां न कळे तों हांसुं येत मला ॥

परि तें कळुनी तिला तिच्याही खळी पडे गाला ॥

इतुक्यामध्यें चेंडु उडाला अडगळींत पडला ॥

बघे बाळ चहूंकडे जरी तरि मिळे न तो त्याला ॥

निराश झाला, थकुनी बसला, बाळ जरा रडला ॥

रडत रडतची फिरुनी लाडका लागे शोधाला ॥

लक्ष्य देउनी फार शोधितां अवचित सांपडला ॥

हंसत लाडका खेळामाजीं फिरुनी दंग झाला ॥

निःश्‍वासातें सोडित मी हा प्रकार पाहोनी ॥

पाहे ती मजकडे वदे मी तन्मन जाणोनी ॥

खेळत आहों असेंच आपण अतीव आनंदें ॥

बागडतो हा चेंडु आपुला असाच स्वच्छंदें ॥

परि संसारीं बहु दुःखांची अडगळ ही साच ॥

एके दिवशीं बाळहि जाइल चेंडुसारखाच ॥

रडत बसूं मग असेच आपण प्रिय बाळासाठीं ॥

फिरुनि हंसूं का असेंच---परि छे; आशा ती खोटी ॥

तोंच वदे ती "पुरे गडे, हें बोलूं नये असलें" ॥

बघे मजकडे रागानें परि हसतहि प्रेमबळें ॥

पाहत होतों असेंच आम्ही कांहीं दिन जातां ॥

त्या दिवसाची स्मृति होऊनि ती भग्न करी चित्ता ॥

तशीच होती अडगळ सारी--चेंडुहि तो होता ॥

किती यमाची निष्ठुरता परि - बाळ तेथ नव्हता ! ॥

बघुनि वदे ती--"चेंडु हाच तो ! बाळ परी नाहीं " ॥

परस्परातें मिठी घालुनी रडलों दोघेही ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP