शब्दांमध्यें, अर्थांमध्यें प्रासामध्यें काव्य नसे ।
नानारंगी वस्तूंतहि नच सौंदर्याचा लेख वसे ॥
सिंहाचें बळ अफाट म्हणजे शौर्याचें तें स्थानच कां ? ।
गोड सुरावट वेळू करिती; गाणें त्याला म्हणूं नका ॥
उंची इमला शिल्प दाखविल; शोभा म्हणजे काव्य नव्हे ।
काव्य कराया जित्या जिवाचें जातिवंत करणेंच हवें ! ॥
काव्याची रचना नसे कठिण ही, अर्थास लागे कवि ।
आलीं वक्र जरी प्रकाशकिरणें तेजास दावी रवि ॥
अर्थावाचुनि बोल सुंदर जरी शोभा न त्यातें असे ।
शृंगारुनि उगाच प्रेत, परि तें जीवंत का होतसे ? ॥१॥