डोळ्यांनीं बघतों, ध्वनी परिसतों कानीं, पदीं चालतों ।
जिव्हेनें रस चाखतों, मधुरही वाचेम अम्ही बोलतों ॥
हातांनीं बहुसाल काम करितों---विश्रांतिही घ्यावया ।
घेतों झोंप सुखें---फिरुन उठतों ही ईश्वराची दया." ॥१॥
पूर्वीं पूर्ववयें प्रसन्नमयता जेव्हां मिळे सृष्टिला ।
शाळेच्या चिमण्या जगांत असतां हा श्र्लोक मीं वाचिला ॥
साध्या बाळमनास अर्थ पटला----आनंदही वाटला ।
आतां का करुणारस स्मृतिबलें त्याच्या असा दाटला ? ॥२॥
डोळ्यांनीं बघणें, ध्वनी परिसणें इत्यादि सर्व क्रिया ।
आतांही घडती; उपाधि चुकल्या नाहींत जीवासि या ॥
जेव्हां जीव थकून पाहत परी विश्रांतिही घ्यावया ।
नाहीं झोंप सुखें----अहो, हरपली ती ईश्वराची दया ! ॥३॥
सौंदर्यें भरल्या जगास बघुनी हा प्रश्न चित्तीं उठे ।
जीवानें जगिं काय कार्य करणें श्लोकांत नाहीं कुठें ॥४॥