अखेर झाली आतां ॥घे हा॥ प्रणाम जातां जातां ॥धृ०॥
जिंकुनि तुजला प्रेमें होइन दास तुझा जन्माचा
या आशेवर जीव टांगला होता या दीनाचा ॥१॥
नजर जराशी तुझी बदलतां थोडा थोडा होई ॥
वेडा माझा जीव बुडविला तूं शोकाच्या डोहीं ॥२॥
होतें नव्हतें त्याची केली तुझ्या ठिकाणीं पोंच ॥
जीवांच्या जाळ्यांत झेलला शब्द न पडला तोंच ॥३॥
रुप मनोहर असलें, बुद्धिहि तीव्र लाभली तुजला ॥
खर्या गुणाची पारख कांहीं असेल तव हृदयाला- ४॥
वेडी आशा अशी धरुनिया धडा जिवाचा केला ॥
भल्याबुर्याचा भेद न तुजला, अनुभव भलता आला ॥५॥
केल्या ज्याच्या पायघडया मीं तुझ्या पावलांसाठीं ॥
त्या हृदयाला तुडवुनि गेलिस नटव्या थाटापाठीं ! ॥६॥
जग सगळें हें डोळ्यांपुरतें, रुप जिवाला पुरतें ॥
उदार हृदया परि निर्दय जग दगडाखालीं पुरतें ॥७॥
ज्या देवानें जग हें केलें, ज्या प्रेमें हें चाले, ॥
त्या देवाला, त्या प्रेमाला, जाळिन आतां, बाले ॥८॥
जगावांचुनी लाभतीस तरि जग मीं केलें असतें ॥
तुझ्यावांचुनी जग हें आतां असून झालें नसतें ! ॥९॥
दिला तिलांजलि अश्रूंचा हा त्या प्रेमाच्या नांवा ॥
परतायाचें नाहीं आतां त्या प्रेमाच्या गांवा ॥१०॥
होइल होइल वाटत होतें तेंच अखेरिस झालें ॥
नांव घेतल्यावांचुन आतां मनांत झुरणें आलें ॥११॥