धन्य पंढरी ! धन्य भीवरा ! धन्य चंद्रभागा !
भक्तांसाठीं वैकुंठींचा नाथ जिथें जागा ॥धृ०॥
स्वानंदाचा गाभा, शोभा ब्रह्ममंडळाचि ।
वैरागरिंचें रत्न मनोहर, आशा पुण्यांची ॥
कैवल्याचें निधान केवळ, माता संतांची ।
तो प्रभु झाला सगुण सांवला गोकुळिंच्या रंगा ॥धन्य०॥१॥
भक्तराज तो पुंडलीक या जगीं एक जाणा ।
हांक जयाची ऐकुनि धांवे लक्ष्मीचा राणा ॥
करावयास्तव जगत्रयाच्या अखंड कल्याना ।
कटिं कर, समपद, विटेवरी करि उभा पांडुरंगा ॥धन्य०॥२॥
स्वच्छंदें सच्चिदानंदपद रमे वाळवंटीं ।
’जय जय विठ्ठल’ नाद एक हा संतांच्या कंठीं ॥
पहावया स्वानंदसोहळा सुर करिती दाटी ।
’पुंडलीकवरदा हरि विठ्ठल’ रंगवि दिग्भागा ॥धन्य०॥३॥