पदर आणिले तुझे कांहिं तूं, माझे आणीं मीहि तसा ॥
हांसत खेळत गोफ गुंफिला, कळलें नाहीं कधीं कसा ॥१॥
एकामेकांभंवतीं फिरतां, गिरकी जीवांना आली ॥
चढत चालला खेळ जसा तो, नजरहि धुंद तशी झाली ॥२॥
कुणीं निंदिलें, कुणी वंदिलें, कुणि हंसलें, रडलेंहि कुणी ॥
नाहिं पाहिलें आम्हीं तिकडे, विश्व बुडालें प्रेमगुणीं ॥३॥
परि दैवाचा खेळ निराळा - खेळ नकोसा तुज झाला ॥
ज्या खेळानें जीव रंगला, त्याचा कंटाळा आला ॥४॥
गोफ गुंफिला उलगडण्याचा कठिण काळ येउनि थडके ॥
हाय, वदावें काय ? जिवलगे, ऊर तेवढा हा धडके ॥५॥
हळूहळू ओढणें हळु जरा ओढायाची कां घाई ? ॥
भलता धागा ओढितांच तूं, जीव जिवलगे, हा जाई ॥६॥
थांब, उलगडूं गोफ कठिण हा शांत बुद्धिनें सखे असा-॥
कीं न तुटावा पदर एकही, धागा धागा नीट तसा ॥७॥
ना तरि होईल हानि आपुली आणि जगाचें हंसें तसें ॥
एक्या ठायीं आलों कां वद दूर व्हावया सखे असें ? ॥८॥
कठिण असे, तरि उलगडणें हा गोफ असे आतां भाग ॥
ना तरि त्याचा पीळ राहुनी छळील तो जागोजाग ॥९॥
मनापासुनी जें केलें, जें मान्य जिवांनाही झालें ॥
विमनस्कपणें परी आज तें निस्तरणें नशिबीं आलें ॥१०॥
कठिण जोडणें, परी तोडणें सुकर वाटतें जनांप्रती ॥
उलटा अनुभव आला आम्हां, गुंग जाहली इथें मति ॥११॥
अनुष्टुभ्
खेळतां गुंफिला गोफ, जीव त्यालागिं वाहिला ॥
’गोविंदाग्रज’ सांगेना---कीं त्याचा पीळ राहिला ॥