मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
कवीचा वधूवरांस आहेर शार्...

राम गणेश गडकरी - कवीचा वधूवरांस आहेर शार्...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


कवीचा वधूवरांस आहेर

शार्दूलविक्रीडित

श्रीमन्मंगल मंगलप्रद असे जेथें उभा सर्वदा ।
मोदें तेविं सदा सदाश्रितपदा श्रीशारदा सर्वदा, ॥
पद्माही करि सद्म ज्यास अपुलें त्या मंडपीं मंगल ।-
जोडी मंगल कार्य मंगलतरा चिन्मंगला मंगल ! ॥१॥

गंगौघा यमुना, सुकीर्ति विजया, चंद्रास तारा रवा, ।
अर्थातें प्रतिभा, कवीस कविता, स्वर्गा धरा सुंदरा, ॥
आत्मारामपदासि मुक्ति मिळतां जो हर्ष वाटे जना, ।
देवो तेविं अपूर्व योग तुमचा तो सर्वथा सन्मना ! ॥२॥

श्रद्धा साधुजनीं, नया गुरुजनीं नम्रत्व विद्वज्जनीं, ॥
सेवा सेव्यजनीं, दया निजजनीं, स्नेहार्द्रता सज्जनीं, ॥
माया दीनजनीं क्षमा परजनीं, सुप्रेम सार्‍या जनीं, ।
ऐशा निर्मल सद्‌गुणांप्रति सदा आधार द्या स्वा मनीं. ॥३॥

मातातात जगांत वागति, न तें होई तुम्हांतें पुरें, ।
तन्मार्ग क्रमिला यथाविधि, तरी कर्तव्य थोडें उरें. ॥
त्यांनीं वाढविलें तुम्हांस; ऋण हें तुम्हांवरी राहि; जें- ।
वाळें वाढवुनी तुम्हांसम गुणी, तें फेडिलें पाहिजे. ॥४॥

आलें चालत जें क्रमागत कुळीं त्या सद्यशोवैभवा--- ।
रक्षा दक्षपणें; सुलक्षणगणें लक्षैकधा वाढवा. ॥
ठेवा सुस्थिर वैभवा; परि करा त्या सद्यशा चंचल. ।
यावच्चन्द्रदिवाकरौ पसरुनी आसेतुहैमाचल ! ॥५॥

जैशा मस्तकिं या सुरक्तधवला मंत्राक्षता अक्षता ॥
तैशी सत्कृतिसंघवृष्टिकरणीं ठेवा सदा दक्षता. ॥
जैसा गर्जत वाद्यनाद सुयशा तैसें जगीं गाजवा ।
प्रेमें सुस्थिरशा चिरंतनयशा ऐशा ध्रुवा लाजवा ! ॥६॥

मालादान न हें; परस्पर परी सर्वस्व संतर्पण !।
केलें गुंफुनि सद्‌गुणांहिं सुमनें हें नित्य आत्मार्पण !॥
गंगायमुना ओघ भिन्न असतां एकत्र होती यथा ।
झालां त्यापरि एकरूप इथुनी; आतां न व्हा अन्यया !॥७॥

जें जें सुंदर जें मुखप्रद तसें जें जें महन्मंगल !॥
आशीर्वाद सहर्ष वर्षित असा ज्या सान्य आहे रसा ।
‘गोविंदाग्रज,’ शब्दहार करि हा सामान्य आहेरसा ! ॥८॥

प्रासंगिक-किंवा अपासंगिकव---

श्लोक

[एका सार्वजनिक समारंभांत, एका थोर गृहस्थाबरोबर आलेल्या त्याच्या उघवर कन्येच्या गळ्यांतहि इतरांप्रमाणें सहजगत्या व्यवस्थापकांनी पुष्पहार घातला; त्यावेळच्या त्या मुग्धेच्या वृत्तीस पाहून--]

सन्मानार्थ सभेंत हार कुणिंसा कंठीं तुझ्या घातला ।
तों झालें तुज कां कसेंच ? इतका संकोच कां वाटला ?

लोकांदेखत लाजसी नवल हें कांहीं न बाले ! परी ।
वाला पुष्पवती सलज्ज असते एकांतिंही यापरि ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP