क्षमा करी, जिवलगे ! क्षमा करिं ! न लावितां अवधि ॥
कोमल हृदया कठोर वचनीं छळि हा अपराधी ॥१॥
क्षमा करावी मी तुज, बाले, आणि तूंहि मातें ॥
असेंच आतां जडलें आहे दोघांचें नातें ॥२॥
परस्परांस्तव आपण ऐसा प्रत्ययही आला ॥
तुजवांचुनि मज सुचेरुचेना; मजविणही तुजला ॥३॥
क्षणमात्राचा राग अनावर--स्वभाव दोघांचा ॥
समजुनि हें मग राग धरावा कोणीं कवणाचा ? ॥४॥
जीवाच्या बागेंत खेळतो पक्षी प्रेमाचा ॥
पिसामागुनी पिसें काढणें, मार्ग न सुज्ञाचा ॥५॥
पश्चात्तापें हृदय हलवितां अश्रूंच्या धारा ॥
वाहुनि त्याला लाभूं दे तो मोत्यांचा चारा ॥६॥
जें झालें तें विसरुनि, सखये ! टाकुनि इतराजी ॥
भला बुरा मी मान्य करुनिया होशिल ना माझी ? ॥७॥
’गोविंदाग्रज’ आणुनि नयनीं जीवाचें तोय ॥
विनवित; बाले ! लिहीं स्वहस्तें तूंच पुढें-- ॥ ८॥