बागेंत बागडणार्या लाडक्या लहानग्यास---
थांब जरासा बाळ ! ॥धृ०॥
सुंदर खाशा प्रभातकाळीं,
चहूंकडे हीं फुलें उमललीं,
बाग हांसते वाटे सगळी !
शीतल वारा, या जलधारा कारंजाच्या छान !
थांब जरासा बाळ !
रम्य तडागीं निर्मळ पाणी,
गातिं पांखरें गोजिरवाणीं,
आनंदाचीं वसलीं ठाणीं,
खरें असे रे ! तरी नको रे मारूं लाडक्या धांव !
थांव जरासा बाळ !
पाहुनि सौख्याचा ठेवा !
सृष्टि करीलचि माझा हेवा !
माझ्यापासुनि फसवुनि न्यावा,
यत्न परोपरि, करितिल सारीं, ! भुलशिल तूं लडिवाळ !
थांब जरासा बाळ
तर्हेतर्हेचीं फुलें विकसलीं,
रंगी बेरंगीहीं सगळीं,
तूंही शिरतां त्यांच्या मेळीं;
माझें मग तें, फूल कोणतें कसें ओळखूं सांग ?
थांब जरासा बाळ.
बघ सुटला हा मोठा वारा,
वायुवृत्ति तव देहहि सारा !
उडवुनि नेइल तुला भरारा !
दिंगतराला, जातां बाळा ! पुन्हां कसा मिळणार ?
थांब जरासा बाळ !
स्वच्छ तडागीं प्रतिबिंबातें,
पाहुनि वेडया धरावयातें,
चुकुनी जाशिल पाताळातं !
तयासारखा, क्षणीं पारखा होशिल बा आम्हांस !
थांब जरासा बाळ !
किती बुडबुडे पाण्यावरती,
इकडुन तिकडे तरंगताती,
चंचल लहरी, तूं त्या साथी,
क्षणांत बा रे, लपाल सारे, काळाच्या उदरांत !
थाब जरासा बाळ !
फूलपांखरें हीं स्वछंदी,
तूंही त्यांच्यासम आनंदी,
क्षणांत पडशिल त्यांच्या फंदीं !
त्यांच्या संगें, त्यांच्या रंगें, जाशिल उडुनी दूर !
थांब जरासा बाळ !
अशा तुला मग वागडतांना,
भरभर वार्यावर फिरतांना,
फुलांत दडतां कीं उडतांना,
कवण उपायीं, आणूं ठायीं, पून्हां ? लाडक्या सांग !
थांब जरासा बाळ !
शब्दावांचुनि मंजुळ गाणें,
अतयाचा देवचि जाणे !
गाइन माझें गोजिरवाणें,
सप्तसुरांपरि या वार्यावरि विरुनी जाशिल पर !
थांब जरासा बाळ !
बालरवीचे किरण कोवळे,
कारंजावर पडति मोकळे,
रंग खेळती हिरवे पिवळे,
धरावयासी, त्या रंगांसी जाशिल बाळा खास !
थांब जरासा बाळ !
जडावेगळी अमूर्त मूर्ति,
कल्पकतेची कीं तूं स्फूर्ति,
पुण्याची मम आशापूर्ति,
रविकिरणांवरि, जलधारांतरिं, तन्मय होशिल पार !
थांब जरासा बाळ !