होता एक जुनाट आड पडका, ओसाडसा जो असे,
कोठेंसा, कधिंचा, विशेष नव्हता कोणास तो माहित;
होतें काय तयांत हें नच कधीं कोणी पहाया बसे,
नाहीं जात कधीं तिथें कुणि जिथें नाहीं स्वतांचें हित !
होता आड खरोखरीच अगदीं तैसा दिसायास तो,
जो जैसा दिसतो जगास दुरुनी, तैसाच तो भासतो;
घेतो कोण उगाच कष्ट इतके लोकीं खर्याखातर !
’आहे भूत तयांत खास !’ वदती ऐसेंहि कोणी तर
बोले वाइट त्यास कोणि, नसतो होती वदंता जरी,
लोटी सृष्टिहि त्याप्रती जरि तशा त्या आडमार्गावर,
टाकीना नुसती जरी नजरही कोणी बिचार्यावर,
देवानेंहि दिलें असेंच नव्हतें टाकून त्याला तरी !
देवाला करणें-विचित्रच तरी आहे किती गोष्ट ही,
होतें नाचत एक फूल तसल्या ओसाड आडांतहि !
२.
पानांची गरदी लता करिति त्या आडाचिया भोंवतीं,
वाटे अंथरलें जणूं कफन तें जीवंत तोंडावरी;
काळीभोर कभिन्न गर्द विलसे छाया मधें खोल ती,
आडांतील जलांतही मिसळुनी त्यालाहि काळें करी !
आडाच्या असल्या भकास उदरीं होतें तसें फूल तें;
प्रेमाचा मृत अश्रु जेविं गिळिला जीवन्मृताच्या मनीं;
केव्हांही नच लागला सुमनसा वाराहि बाहेरुनी;
काळोखांतिल तेवढेंच जग तें होतें तयाभोंवतें.
पुष्पाचें वळलें असे मुख सदा पाण्याकडे खालती,
श्वासानें जणुं त्याचिया चिमुकल्या लाटा जलीं हालती;
केव्हां तन्मकरंदबिंदु पडतां जीं वर्तुलें चालतीं,
घालाया रमणीकरांत बघतां तेव्हांच मागाल तीं !
येई एक कसाबसा तरि सदा तेथें रवीचा कर,
पुष्पाचें प्रतिबिंब तो जलिं करी त्यालागिं दृग्गोचर.
३.
त्या चित्राप्रति भावबद्धनयनें आशादृशा पाहणें---
हा नित्यक्रम भाबडया सरळ त्या माझ्या फुलाचा असे;
त्याला सर्वहि वाहणें, विरुनिया त्याच्यामधें राहणें,
आशा एकच एवढी मनिं सदा वेडया फुलाच्या वसे.
त्याचा वास असे मनोहर सदा, शंका नसे याविशीं,
या भावें परि गंध जो दरवळे न्यारीच त्याची मजा !
केव्हांही हलतांच फूल पवनें खेदास देते रजा,
प्रेमानें डुलतां परी करितसे वृत्तीस वेडीपिशी !
हांस फूल जलांतल्या बघुनियां त्या स्वीय चित्राकडे,
हांसे तेंहि तसेंच तों अधिक हें हांसें तसें बापडें;
नाचे हें पवनांत, तेंहि तिकडे पाण्यामधें बागडें,
’माझा भाव तयाप्रती कळतसे’ मानीत हें बापडें;
जोडीचा महिमा असा चहुंकडे; धिक् सर्व जोडीविणें
लाभे जोड तरी कुणास न रुचे शून्यांतलेंही जिणें ?
४.
खालीं तोंड करुन चंचल जलीं पाहून वेडयापरी
भावाचे अपुल्याच रंग वठवी त्या प्रेमचित्रावरी;
घेई यापरि बांधुनी उगिच तें जीवास अशागुणीं,
हांसूं मात्र नका म्हणून कधिंही माझ्या फुलाला कुणी !
त्या आशेंत रहस्य काय लपलें जाणावयाला जर---
वार्यानें करपून जातिल अशीं व्हावीं फुलांचीं मनें;
चित्रें चंचल जीं अदृश्य उघडया डोळ्यांस भावाविणें
पाहायास तयांस नीट तुमचे डोळे फुलांचे करा !
भावाचे अपुर्याच रंग बघणें वाटेल तेथें मना,
त्या वेडयाबगडया फुलांतच असे का तेवढया दोष हा ?
मोठे पंडित काय लाविति दिवे, ते एकदांचे पहा,
कोणीं काय कधीं कुठें बघितलें जें ये विकारांत ना ?
जो तो या जगतावरी पसरतो छाया मनाची सदा
निःश्वासें तुमच्याच सृष्टि करपे, तेव्हांच ती तापदा !
५.
कांहीं काळ असाच फूल गमवी, आशा पुढें वाढली;
चुंबावें जलिंच्या फुलास म्हणुनी तें मान खालीं करी;
वार्यानें मुखा लागतांच उदका छाया विराली जलीं,
पाणी मात्र पडे मुखीं सहज तों, तैसेंच आशेवरी !
त्या धक्क्यासरसेंच फूल मग जें कोमेजलें एकदां,
नाहीं तें हंसलें पुन्हां ! विकसलें नाहीं पुन्हां तें कदा !
आशेनें दुसर्या दिनीं फिरुनि तो आला रवीचा कर,
गेला खिन्न मनें, परी न चमके त्या प्रेतमात्रावर.
पाण्यामाजि पुढें गळून पडलें तें फूल वेडें पिसें,
पाताळांत कुठें असेल दडलें का प्रेमनिर्माल्य तें ?
छेः छेः ! प्रेममय स्वरुप धरुनि भूतापरी हिंडतें,
कोठें आज उजाड जें, अजुनिही तेथें कधीं तें दिसे !
तें मेलें म्हणुनी उणें न ठरतें; मच्चित्त त्याला भुले;
मेलेल्या हृदया मदीय असलीं वाहीन मेलीं फुलें !