भीमकबाळा ती वेल्हाळा टाकुनि गोपाळा ।
निश्चय केला बंधुवरानें द्यावी शिशुपाळा ॥
विवाहकाळीं खळ तो आला तंव राजसबाळा।
शोकभरानें विव्हळ झाली, दोष देइ भाळा ॥
"अजुनि तरी या दासीसाठीं या हो गोपाळा ।
काळवेळ ही जवळी आलीं, संकट हें टाळा ॥
ऐन समयिं का निष्ठुर झालाम ? काय असें केलें ?
दीनांवरिचें प्रेम सदाचें आज कुठें लपलें ?
कधिं पाहिनसें झालें मजला सांवळि ती काया ।
कधिं वाहिन ही काया माझी देवा तव पायां ?
कधीं सांठविन रुप मनोहर या नयनीं देवा ?
मिळेल केव्हां अभागिनीला प्रेमाचा ठेवा ?
नका करुं छळ याहुनि माझा अजुनी घननीळा ।
वाट बघूं किति घेउनि हातीं अश्रूंची माळा ?
किती आळवूं परोपरीनें ? कंठ किं हो सुकला ।
तरी यावया अजुनी माझा माधव कां चुकला ?
सर्वसाक्षि भगवंता ! आतां अंत नका पाहूं ।
---कीं विषपानें प्राण तरी हा पदकमला वाहूं ।
मीच अभागी; म्हणुनी आपण अजुनी नच आलां ।
ब्रह्म सगुण जें दुर्लभ सकळां; मिळे कसें मजला ?
रडतां यापरि अश्रुजलानें पदर भिजुनि जाई ।
ऊर भरुनि ये---शब्द न चाले---कवन विरुनि जाई ॥१॥