रानोमाळ । आंधळ्यांची चाले माळ ॥धृ०॥
दृष्टि न यांतिल एकालाही । एकामागें दुसरा जाई ।
अर्धा डोळस रस्ता दावी । करी संभाळ । आंधळ्यांची....॥१॥
तुकडयासाठीं करिती ओरड । पैशासाठीं सारी धडपड ।
तोंडीं हरिनामाची बडबड । हातीं टाळ । आंधळ्यांची.....॥२॥
यांना साजे नांव भिकारी । थोडयासाठीं लोंचट भारी ।
धरुनी धरणें बसती दारीं । उठवि कपाळ । आंधळ्यांची....॥३॥
यांना दिसतें केवळ ’आज’ । नाहिं कांहिं ’उद्यां’ची लाज ।
मिळेल कैशी अगदीं वांझ । सायंकाळ । आंधळ्यांची....॥४॥
येइल ’उद्यां’ जरी एखादी । ठेवूं दृष्टि मिळवुनी आधीं ।
न तरी येइल ही कर्मामधिं । पुन्हां जंजाळ ।आंधळ्यांची॥५॥
अशा विचारें देवापाशीं । मागति कधीं ही दृष्टि न खाशी ।
काय म्हणावें या मूर्खांशीं । प्रभो संभाळ । तूंच ही आंधळी माळ ॥६॥