जगद्गायका बालकवे ! चल, ऊठ ऊठ आतां ॥
तूंच निजसि तरि कोण सांग मज जागवील जगता ? ॥धृ०॥
हा तुझा अरुण बघ उगवे पूर्वेकडे ॥
वद कोण तयाचें गाणें गाइल गडे ? ॥
हा देवद्वारीं चौघडाहि धडधडे ॥
करि कोण तुझ्याविण बोल तयाचे खडे ? ॥
तव कवनाची वाट पाहतीं पहा उगवतीं किरणें ॥
गाउनि गाणीं प्रेमळ त्या उल्हास तूंच रे देणें ॥१॥
बघ सृष्टीचे कवि कसे भरारति गगनीं ॥
गातात कोणत्या स्वैर सुरांचीं गाणीं ? ॥
चल एकजीव हो लौकर त्यांच्या गानीं ॥
स्वर्गीत सांग मग तेंच आमुच्या कानीं ॥
सौंदर्याची द्वाहि फिरविण्या बा तव अवतार ॥
मग ऊठ निजसि कां असा गडया रे झोंप झालि फार ॥२॥
बघ फुलें उमललीं आतां सारीं नवीं ॥
तव रसवंतीचीं फुलेंहि आम्हां हवीं ॥
तव रसाळ रसना-रससागरिं जग झुलवीं ॥
रस उधळुनि गगनीं लपल्या मुकुला खुलवीं ॥
नव्या सृष्टीच्या नव्या यशाचा तूंच शिलेदार ॥
नव कवितेच्या जरिपटक्याचा तुलाच अधिकार ॥३॥
तव गान खळाला नेइल पुण्याकडे ॥
शिकवील यमाला सदयत्वाचे धडे ॥
फत्तरांत वाजविल आनंदापलिकडे ॥
सूर खडा धर लावुनि गगनापलिकडे नक्की
करि पुढें खडा जगदीश देउनी प्रेमगांठ पक्की ॥४॥
भ्रमभरें विश्व हें सर्व जयांमधिं बुडे ॥
चल फोडुनि टाकूं ते फसवे बुडबुडे ॥
मग बसूं जाउनी काळाच्याही पुढें ॥
तव सुराबरोबर कोण न यापरि उडे ? ॥
’गोविंदाग्रज’ कविसि * तुजसवें ने देउनि हातां ॥
जगद्गायका बालकवे ! चल, ऊठ ऊठ आतां ॥५॥