ज्याच्या बोध-सुधेनें पावन झालें मदीय हीन मन ॥
श्रीज्ञानेश्वर-चरणीं प्रेमानें मी करीतसें नमन ॥१॥
नमिला शिवरायगुरु परळीचा रामदास भक्तमणी ॥
यत्पदकमलाधारें कालभयातें कधीं न विश्व गणी ॥२॥
श्रीवर-कृपा जयावर श्रीवर ज्याचें न चित्त किमपी ही ॥
श्रीवरद-साधुवर्णी श्रीवरदा प्रणति एकनाथाही ॥३॥
शशि भगणीं, मन करणीं, साधुजनीं तेचि हे तुकाराम ॥
तद्वचनपथक्रमणा त्यजुनि धरिल अन्य हेतु का ’राम’ ? ॥४॥
जरि यवन, कवनकरणीं स्मरणीं आणूं नको कबीर कसा ॥
भक्तिवधू धरि करि ज्या भगवज्जनकंकणांत हीरकसा ॥५॥
ज्या हीन हीन म्हणति प्रणति करिति सुमति ज्यास तो चोखा ॥
वंदावा न कसा म्यां ? इंद्रियहो तद्गुणाम्ररस चोखा ॥६॥
ज्यास्तव अंत्यज रुपा धरि हरि तो वंदिलाचि दामाजी ॥
कां थोरवी न द्यावी त्यातें म्यां कृपण देत दामाजी ॥७॥
यत्किंकर शंकरसख नमिला जगदेकविप्रवर नरसी ॥
तद्भक्तिदशमरस सुख देई जे दे कविप्रवर न रसीं ॥८॥
नमिला भक्तिरसाचें धाम श्रीनामदेव जरि शिंपी ॥
लोकीं काम्य न कां ती मोतिं जिच्या उदरिं कठिण वरि शिंपी ? ॥९॥
मान्य कसा न मला हो गोरा जरि होय हीन कुंभार ? ॥
भार जयाचा प्रभुवर वंद्य मला रोहिदास चांभार ॥१०॥
सत्सुमदामीं दासी म्हणुनि न गुंफावि कां जनाबाई ? ॥
अक्षरमालेंतुनि कशि वांकडि तरि टाकवे जना बा ’ई’ ? ॥११॥
दासी श्रीसुखदासीं आम्हांसी मायसी मिरादेवी ॥
सकरण तनु तच्चरणीं त्यजुनि नुतामान कां न कवि ठेवी ? ॥१२॥
वंदन नंद-सुनंदकुंद-सुकलिकालि तुलसिदासाला ॥
मज्जन्मग्रामस्था साधुवरा नमन टेलदासाला ॥१३॥
वंदि विवेकानंदा जरि अर्वाचीन मान्य साधु सदा ॥
कुमतप्रस्तर दुरवुनि वाहविलें जगतिं आर्यधर्मनदा ॥१४॥
हीं षोडश कुसुमें निजवासें निशिदिनिं करोत शुद्ध मला ॥
वंदुनि अर्पी ’सत्सुमदाम’ विनत ’राम’ ईशपदकमला ॥१५॥