राम गणेश गडकरी - दिसे मजला हें पुढें गोड म...
राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
दिसे मजला हें पुढें गोड मूल ।
पडे कोमेजुनि रम्य तसें फूल ॥
एक निर्णय मनिं होत नसे सा ।
विषय द्दष्टीचा द्विविध हा तसाच ॥१॥
जसें वेलीचें दलितगालित फूल ॥
बालविधवेचें तसें पतित मूल ॥
दिसतिं दोन्हीही सारखीं मलूल ।
कृपाद्दष्टीची कुणि न घालि झूल ॥२॥
पांच वर्षाची छबकडी सुरेख ।
जणूं चिमणीशी हिरकणीच देख ॥
कशी चित्रासारखी उभी राही ।
नांव ठेवाया सोय मुळीं नाहीं ॥३॥
कुण्या ऋषिचे यानास अडखळून ।
पडे निखळूनी जणुं नीलपटांतून ॥
आलि खालीं ही चांदणीच एक ।
तरिच इतकी ही चमकते सुरेख ॥४॥
बाल अवयच रेखीव एवढाले ।
कल्पनेच्या जणुं भ्रमें चित्र हाले ॥
काव्य तरळत जणुं हृदयिं कविजनाचें ।
बालसौंदर्याहि असें देहिं नाचे ॥५॥
बालसौंदर्यहि असें देहिं नाचे ।
तरी वाटे हें स्वप्न निर्धनाचें ॥
यास कारण तें पाहतां दिसेची ।
जोड सौंदर्या उदासीनतेची ॥६॥
किती लीले ! तव वदन उदासीन !
सांग बाळे ! कां दिसशी अशी दीन ॥
बघावेंसें वाटतें जरी त्यास ।
तरी बघतां मन होतसे उदास ॥७॥
तोंच माझ्या लागलें कुणी काना ।
जन्मवार्ता कथि चित्तसमाधाना ॥
बालविधवेनें टाकिली अनाथ ।
मिळाली ती बालिका कंटकांत ॥८॥
जंणु कळुनी ही जन्मकथा नीच ।
असे तेव्हांपासून ही अशीच ॥
किती हंसवावी तरी हंसत नाहीं ।
द्दष्टि भूभागीं यापरी सदाही ॥९॥
[अनाथबालकाश्रमांतील एक पांच वर्षांची मुलगी.)
N/A
References : N/A
Last Updated : November 16, 2012
TOP