रचिसि काव्यभूषा ? अथवा कुसुमचापपाशा ? ॥ध्रु॥
मंजुल शब्दें गूढार्थातें, कविराया ! जें झांकी,
चित्रकाव्य तव पाहुनि ऐसें प्रश्न मना पडला कीं--
रचिसि ’वेषभूषा’ ? अथवा कुसुमचापपाशा ? ॥१॥
मंजुल गुंजारवें रंजवी कुंज कुंजगत भृंग,
घालिसि कुंजमुखावरि रुंजी मृदुपदिं होउनि दंग,
रचिसि नादभूषा ? अथवा कुसुमचापपाशा ? ॥२॥
शब्द तुझे व्यक्तार्थावालीं दडविति मूकार्थातें,
गूढभाव लक्षितां लक्ष्य मम भलत्या वेडा वरितें.
रचिसि शब्दभूषा ? अथवा कुसुमचापपाशा ? ॥३॥
सुवेषभूषा लेख्यमिषानें योषिदंतरंगा---
शब्दचित्रिं अव्यक्त रेखुनी हसविसि चित्ततरंगा !
रचिसि चित्रभूषा ? अथवा कुसुमचापपाशा ? ॥४॥
व्यक्त कल्पनांसह मम चित्ता प्रतिभा तव नेई,
अव्यक्ताच्या पटाआड त्या टाकुनि मागें येई.
रचिसि काव्यभूषा ? अथवा कुसुमचापपाशा ? ॥५॥
पद्यावलिंतिल पदपुष्पांच्या अर्थामोदानें
प्रीतिदेवता हृदयिं जागविसि उद्दीपनमोदानें.
रचिसि अर्थभूषा ? अथवा कुसुमचापपाशा ? ॥६॥
अर्थ खरा हा कीं प्रतिबिंबा बिंब दावि तुजशीं,
निजार्थाच मन माझें तैसें पाहत काव्यादर्शी.
रचिसि गूढभूषा ? अथवा कुसुमचापपाशा ? ॥७॥
सुंदररमणीवर्णनपर हें पद्य न मज भासे,
मजसम वेडा भ्रमीं पडाया मद्यचि वाहे खासें !
रचिसि पद्यभूषा ? अथवा कुसुमचापपाशा ? ॥८॥