खरें औषध
जे जे रोग मनास होति, हृदया संताप जो जाळतो,
जे जे घाव जिवास लागुनि जगा तो नित्य कंटाळतो;
त्या त्या विस्मृति हेंच औषध खरें आहे गमे एक तें;
जें लोकीं नसतें तरी मग कुणी जीवंत ना राहतें !
दुर्दर्शन
नाना रोग, जुगुप्सिता, व्यसनिता विच्छिन्न प्रेतावलि,
भूकंपादि अनर्थ, दैवघटितें हीं सर्वही पाहिलीं;
त्यांहीं खिन्न न चित्त होत, परि तें होतें तदा ज्यापरी
विश्रब्ध प्रणयास वंचित यदा सौंदर्य स्वार्थास्तव !