मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
कोवळ्या हालत्या चिमण्या प...

राम गणेश गडकरी - कोवळ्या हालत्या चिमण्या प...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


कोवळ्या हालत्या चिमण्या पिंपळपाना !

कल्पना हले तुज बघुनि असें हालताना !

निजशाखेच्या या शेवटच्या टोंकाशीं

कां इकडुनि तिकडे सांग सारखें फिरशी ?

हा हिरवा, तांबुस रंग काळसर कांहीं;

तूं भिरभिर फिरतां स्पष्ट भेद नच राही.

या झुळझुळत्या वार्‍यानें नाचसी,

कोंवळ्या सूर्यतापानें तळपसी,

आपल्या मिश्र रंगानें झळकसी,

तुजकडेच माझें लक्ष सारखें लागे,

बांधिलें तयाला गूढ कांहिं अनुरागें ।

जीं गूढ अप्‍सरागीतें नभिं पाझरतीं,

तीं वहात येतीं खालीं वार्‍यावरतीं ।

ऐकुनी तयांचे सूर मुके नवलाचे,

या हृदयकंपनें जीव काय तव नाचे ?

कीं जगीं ताप जो सारा उसळला,

रवितेजामाजिं भरारा मिसळला,

लागतां तयाचा वारा, कोमला,

थरकांप होत हा तव कोमल देहाचा !

वद नाच भीतिचा कीं हा आनंदाचा ?

हें तुझ्याच दुःखें हृदय असें तडफडतें ?

विश्वैक्यवृत्तिची ध्वजा काय फडफडते ?

तूं स्वयें हालसी, कीं तुज कोणी हलवी ?

सुखदुःखी झुलसी स्वतां इतर कीं झुलवी ?

कळतसें तुझें तुज का हें हालणें ?

कीं दुसर्‍यासाठीं आहे चालणें ?

कीं भावावांचुनि पाहे डोलणें ?

तव अस्तित्वाचें ज्ञान असे कां तुजला ?

तुज इच्छातृप्ति क्रियाभेद का कळला ?

तुजभंवत जी ही सृष्टि असे पानांची,

कल्पना असे का तिला तुझ्या नाचाची ?

रस एकच तरुचा तुम्हांमधूनी वाही---

सुखदुःखभाव ही जोडि तुम्हां कीं नाहीं ?

विश्वेंच्या विश्वें सारीं यापरीं

स्थलिं भिन्न भिन्न आकारीं, भूवरीं

नांदती गडया कांतारीं कितितरी !

जाणीव तुम्हांला परस्परांची का रे

जीवैक्य असे कीं, भिन्न भिन्न जग सारें ?

क्रम हाच काय वद तुझ्या जीवनाचा रे ?

परिणाम करित का सृष्टीवर हें सारें ?

कुणि चित्रगुप्त हें लिहून ठेवित आहे ?

कीं स्वैरनदाच्या ओघावर हें वाहे ?

हें अवश्य जग चालाया कां असे ?

कीं नसल्याहुनिही वायां हें पिसें ?

स्फूर्तिची कुणाच्या काया हलतसे ?

मम नयनिं चित्रसम जाउनि बैसायाचें,

इतुकेंच कार्य का सांग तुझ्या नाचाचें ?

मम करीं कपाळीं दुर्दैवाच्या रेषा

मजसाठिं लिहिति चिरदुःखभोग हा पेशा !

परि असति तुझ्या तर रेषा सार्‍या अंगीं,

दुःखही असे का तितुकें त्यांच्या संगीं ?

कीं वार्‍यावरच्या ताना यापरी

उमटल्या अशा फिरतांना, तुजवरीं ?

त्या फिरुनि फिरुनि घेतांना अंतरीं---

निजनादब्रह्मीं गुंग होउनी डुलसी ?

तें गीत आंतल्या आंत ऐकूनी खुलसी ?

कीं दुर्दैवाच्या किंकाळ्या, या ताना,

तव कोमल हृदयीं ठेविति वण जातां ना ?

खालतीं पडुनि मग मातिंत मिसळुनि जाया,

तूं फडफड करिशी अशी भूमिवर याया ?

परि थांब ! जरा गा गाना, तोषदा,

ऐकवीं माझिया कानां एकदां;

स्थिर राहिं न, पिंपळपाना ! तूं कदा.

मज गाऊं दे, मज नाचूं दे, तुजसंगें,

सुखदुःख सारखें सेवूं मानसरंगें !

संबंध असो वा न्सो आपणांमाजीं,

मी एक कारणासाठीं तुजवर राजी--

नवबालाहृदयीं प्रीति नवी हलतांना

तच्छिरीं हलसि तूं तसाच पिंपळपाना !

जीं हृदयकंपनें सारीं मानसीं,

तीं आम्हांतें बाहेरी दाविशी !

निर्दोष मनानें भारी हालसी !

कुणि बाला जरि देइल असला मान,

तरि सुखेंच होइन मीही पिंपळपान !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP