जें मनास शिवलें नाहीं । ठावें न कल्पनेलाही । सुख असें ।
जें दिसे न कवण्या जागीं । जें अवर्ण्य वाणीलागी । सुख असें ।
कविताही प्रतिभाशाली । कल्पितां जयातें थकली । सुख असें ।
एकदां । कष्टतां सदा । पुढतिं नच कदा-
अनुभवा येई । तें पहिलें चुंबन देई । सुख असें ॥१॥
चित्रासम रमणी बसली । नवयौवनशोभा ठसली । तन्मुखीं ।
करिं ठेवुनि कोमल गाला । करि विचार न कळे कसला । सारखी ।
ढोले ना अथवा हाले । मग कुठलें बोले चाले । चित्र तें ।
रंजना । मुग्धयौवना । करित कल्पना ।
भावि कालाची । (तुज ठावें) त्या दिवसाची । दिवस तो ॥२॥
चित्र हें पाहुनी असलें । नेत्रांचें सार्थक झालें । वाटलें ।
परि तरंग अद्भुत उठले । अनुभवा न पूर्वीं आले । जे कधीं ।
जाउनी चोरटया चालीं । झांकिले नयन करजालीं । न कळता ।
संभ्रमें । दचकली गमे । त्वरित विभ्रमें ।
श्रमवि कर दोन्ही । काढाया नयनांवरुनी । मम करां ॥३॥
तों बघुनी उघडया गाला । उन्माद मानसीं भरला । स्वैरसा ।
संमोह पडे नयनांला । मज विसर जगाचा पडला । क्षणभरी ।
ठेवुनि मुख सखिच्या गालीं । आणिली गुलाबी लाली । त्यावरी ।
हांसली । फार लाजली । दूर जाहली ।
एक निमिषांत । झिडकारुनि माझा हात । हंसतची ॥४॥
हा खेळ एक निमिषाचा । एकदांच अनुभव त्याचा । नच पुन्हां ।
तें वारें आलें गेलें । जन्माचें सार्थक झालें । परि गमे ।
तें निमिष, स्थिति ती, सुख तेम । चित्ताच्या दृष्टिस दिसतें ॥ सारखें ! ॥
स्वानंद । कमलमकरंद । सुधानिरयंद ।
भूवरी आणी । जें वर्नावेम तें कोणी । सुख तसें ॥५॥
एकदांच अनुभव त्याचा । आरंभ अंत सौख्याचा । एकदां ।
आयुष्य न त्याला क्षणही । जन्मही पुन्हां त्या नाहीं । एकदां ।
मनिं चटका लावायासी । पाठवी दैव जणुं त्यासी । एकदां ।
निशिदिनीं । वाटतें मनीं । नित्य जन्मुनी ।
मरण सोसावें । परि पहिलें चुंबन घ्यावें । फिरुनिही ॥६॥