पिठांत पाणी घालुनि केलें दूध भलें निष्ठुर काळें,
पितात गरिबांचीं बाळें.
अम्हां मराठी शाहीरांच्या कवनाचा वाहे पूर,
समाधान त्यांतच चूर !
पोत घालुनी गळ्यांत फिरती भिल्लांच्या काळ्या पोरी;
कवीश्वरें चढलीं भारी !
गरिबीला बोलणें नसे हें, दोष दरिद्री गर्वाला----
हात घालि जो स्वर्गाला !
बाष्काळ बडबड ऐकुनि चित्तीं हास्याचे ध्वनि उठतात,
---आणि आंतडीं तुटतात !
खेद वाटला---तोंच आठवे बालकवीची रसवंती;
धीर जरा वाटे चित्तीं.
नव्याजुन्यांचा प्रेमळ पाइक ’गोविंदाग्रज’ नमन करी---
भल्याबुर्यांना एकसरीं.