देवी दर्शनदुर्लभ झाली
आशालेशहि नच कांहीं;
संसाराची होउनि भाषा
जीवनकवनांतुनि वाही !
प्रतिवस्तूचा शब्दचि उरला
भावमया जगतीं राही;
त्या शब्दांचा अर्थ कुणातें
वस्तुज्ञानाविण नाहीं !
गूढार्थचि तो अलिखित भागीं
मत्कवनीं भरुनी जाई;
नसतां परि संकेत जिवाचा
उमगेना तें कवणाही !
गीत कळावें जीस नसे ती
दिशा शोधिल्या जरि दाही;
’गोविंदाग्रज’ सहजचि कवनें
जाळि निराशा खर दाहीं !