असे एकदां दोघे चौघे कामाला प्रातःकाळीं ॥
घरांतुनी बाहेर निघालों; घाई जाण्याची सगळी ॥
तोंच धडकली समोर येऊनि वृद्धा विधवा दारांत ॥
अपशकून हा पाहुनि बसला त्रासिक चरका चित्तांत ॥
"वेळ साधिते कशी बरोबर पहा अशी पीडा नसती ॥
या विद्रुप अवदसा सारख्या अशा चहुंकडे वणवणती" ॥
चार पावलें पुढें सरकलों विसरुनि सारे झोकांत ॥
एक अडाणी कुणबट आलें कागद घेउनि हातांत ॥
अडवुनि बोले, "वाचुनि दावा दादा कागद हा इतुका"॥
त्रासुनि वदलों. "बाबा, आम्हां दुसरीं कामें नाहिंत का ?" ॥
गिचमिड ओळी-भिकार अक्षर; लावित बसणें हें कोणीं ? ।
दुसर्या कोणाच्या पाठीवर लाद नेउनी ही गोणी ॥
येईना वाचतां तुम्हांला तरि पत्रांचा व्यवहार ॥
कां करितां मग उगाच हा अव्यापारेषुव्यापार ?" ॥
दिलें चिटोरें त्याचें त्याच्या अंगावरती टाकून ॥
चालूं झालों गप्पा मारित कांहीं कांहीं हांसून ॥
जातां किंचित् पुढें आढळे-नांव न घेणें कवनांत ॥
डोकीवरतीं पाटी घेउनि अगदीं शेजारुनि जात ॥
त्या घाणीनें मस्तक फिरलें-रागहि आला भरपूर ॥
बोलत कांहीं आम्ही झालों त्यापासुनि आधीं दूर ॥
"इतका झाला दिवस तरी हे खुशाल अजुनी फिरतात ॥
घाण घेउनी चहूंकडे ही हवे तसे वावरतात ॥
उर्मट तर हे इतके असती-बेमुर्वत देतिल धक्का ॥
बंदोबस्तच या लोकांचा केला नाहीं कुणिं पक्का" ॥
जातां जातां पुढें यापरी एक दिसे पिंपळपार ॥
दत्ताचें देवालय खालीं छोटेसें शोभें फार ॥
सूंदर तरुणी हिंडत होती त्या देवाच्या भंवतालीं ॥
निरखुनि बघतां-हरहर ! होती विधवा ती बाला असली ॥
उचंबळुनी ये करुणारस--नेत्रहि अश्रूंनीं भिजले ॥
निर्दयता दैवाची बघुनी हृदय बिचारें तें थिजलें ॥
न्यायदेवता जागृत झाली त्या सौंदर्या बघतांच ॥
विषय दयेचा लावित नाहीं कोणाच्या जीवा आंच ?॥
"धिग् धर्माला-धिग् रुढीला-तेतिस कोटी देवांना-" ॥
किती बोललों--नको सांगणें ! पाठ असे तें सर्वांना ॥
काम कशाचें ! धाम कशाचें ! एक प्रश्न मग हृदयांत--॥
"सुधारणा होणार तरि कधिं या दुर्दैवी देशांत ?"
अनुष्टुभ्
प्रश्नाच्या उत्तरासाठीं रसिकां जोडुनी करां
’गोविंदाग्रज’ प्रार्थी----कीं समस्या पूर्ण ही करा’ ॥