सहजचि दिसलें पायाखालीं मज फणसाचें पान ॥
सवेंच कवनाचें हृदयींच्या चढत चाललें मान ॥
फणसाच्या त्या पानावरतीं दिसल्या ज्या मज रेषा ॥
कधींकाळाच्या उघडुनि दाविति मनिंच्या आंतरवेषा ॥
लिहुनि ठेविली पूर्ववयामधिं कथा गोड जी पानीं ॥
पुन्हां वाचिली;----आणि जाहला सखेद हर्षहि रमणि !
दोनच नयनीं नीट दिसेना; अंधुक जग हें अवघें ॥
प्रीतीच्या उपनेत्रांवांचुनि-पुढें बोलणें नलगे ॥
डोळे झांकुनि भरभर फिरुनी कथा वाचिली मग ती ॥
हतभागी हे जीव जगीं या स्मरणें केवळ जगती ॥
गांव कुणाचें ?--नांव कुणाचें ? आणि कुणाचें पान ? ॥
सरोवराला परका मधुकर करित रसाचें पान ॥
वार्यासरशीं अंगावरतीं येउनि पडतीं पानें ॥
नेमधर्म त्यां कसला ? अथवा नेम देव तो जाणे ॥
सुंदर चित्रा ! मदपूर्णा ती कथा तुझी आठवते ॥
बाले ! रमणी ! प्रणयभरानें हृदय किती खळबळतें ॥
सळसळती हीं आजहि सखये, भंवतीं हिरवीं रानें ॥
’गोविंदाग्रज’ परी शोधितो तीं फणशीचीं पानें ॥