मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
मार भरारी । चल तोड बंधनें...

राम गणेश गडकरी - मार भरारी । चल तोड बंधनें...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


मार भरारी । चल तोड बंधनें सारीं ! ॥धृ०॥

पायीं गंजत बेडी पडली,
नकळे कोणी केव्हां घडली;
पुढती चाल परी तव अडली,
व्याद भिकारी । चल तोड बंधनें सारीं ! ॥१॥

अवजड बेडीसह जड पाय,
अनाथ जीवांवरती हाय !
टाकुनि चिरडिसि कोमल काय,
निर्दय भारी ! चल तोड बंधनें सारीं ! ॥३॥

नसतां मुळींच तूं अपराधी,
कोण तुझ्या ही पायीं बांधी ?
करुनी निधडा निश्चय आधीं,
फटका मारी । चल तोड बंधनें सारीं ! ॥३॥

तुटतां असली भिकर बेडी,
हंसतिल तुजला भणंस वेडीं,
कोणी तुजशीं धरितिल तेढी,
तयां धिक्करी ! चल तोड बंधनें सारीं ! ॥४॥

मारी गरुडभरारी गगनीं,
सुख तें शेणकिडा का जाणी !
जाई शेणामधेंच कुजुनी !
सुखाचा वैरी । चल तोड बंधनें सारीं ! ॥५॥

असल्या शेणकिडयांच्या जाती,
जिकडे तिकडे बुजबुज करिती,
केवळ मरण्यासाठीं जगती;
येत ओकारी । चल तोड बंधनें सारीं ! ॥६॥

प्रकाश बघतां घुबडें दडतीं
एकांताची आवड वरिती,
रातींबेरातीं परि फिरती,
घाण ही भारी । चल तोड बंधनें सारीं ! ॥७॥

भिडतो गरुड सदा गगनाशीं,
वातावरणीं वसतिहि खाशी !
लावुनियां टक तेजोराशी
बघटी घारी । चल तोड बंधनें सारीं ! ॥८॥

जाऊं त्यांमागुनि धीरानें,
काढूं शोधुनि लपलीं भुवनें,
गगनामागुनि निघतिल गगनें,
करी तयारी । चल तोड बंधनें सारीं ! ॥९॥

रविकिरणाचे दोर मोकळे,
बांधूं नवमेघांचे दोले,
वारा देइल त्यांतें झोले,
ध्यन संसारीं ! । चल तोड बंधनें सारीं ! ॥१०॥

बसुनी तेथें तीन्ही काळीं,
पाहुनि मूर्खपणाच्या चाली,
जगता हंसूं गालिंच्या गालीं,
ब्रह्मानंदीं । रंगुनी स्वैर स्वच्छंदीं ! ॥११॥


References : N/A
Last Updated : November 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP