आहे जो विधिलेख भालिं लिहिला कोणास तो नाकळे ॥
आहे जो सुखदुःखभोग नशिबीं, कोणास तो ना टळे ॥
आहे जीवित हा हिशेब सगळा--हा बोध चित्तीं ठसे ।
देणें हें गतकाळिंचें सकळही सव्याज देणें असे ॥१॥
आशा मावळल्या; समूळ तुटले हृद्बंध नानापरी ।
इच्छा केवळ दुःखदा, अनुभवें हें बाणलें अंतरीं ॥
आतां एकच मागणें तव पदीं, देवा, असे एवढें ।
संसारीं मिळतां न तें, मन सदा शोकाग्नितापें कढे ॥२५॥
आतां दुःख नको, नकोच सुखही, होणार होवो सुखें ।
इच्छा वावरती मनांत, तरि हीं केलीं मुकीं तन्मुखें ॥
"जें कांहीं घडतें सदैव तुझिया इच्छाबळें तें घडे"
ऐसें जाणुनि सोसण्यास मज तें सद्धैर्य दे तेवढें ॥३॥