मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
हें कोण बोललें बोला ? ’...

राम गणेश गडकरी - हें कोण बोललें बोला ? ’...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


हें कोण बोललें बोला ?

’राजहंस माझा निजला !’

दुदैंवनगाच्या शिखरीं । नवविधवा दुःखी आई !

तें हृदय कसें आईचें । मी उगाच सांगत नाहीं ।

जें आनंदेंही रडतें । दुःखांत कसें तें होइ--

हें कुणी कुणां सांगावें !

आईच्या बाळा ठावें !

प्रेमाच्या गांवा जावें---

मग ऐकावें या बोला । ’राजहंस माझा निजला !’

मांडीवर मेलें मूल । तो हृदया धक्का बसला ।

होउनी कळस शोकाचा । भ्रम तिच्या मानसीं बसला ।

मग हृदय बधिरची झालें । अति दुःख थिजवि चित्ताला ।

तें तिच्या जिवाचें फूल !

मांडीवर होत मलूल !

तरि शोकें पडुनी भूल---

वाटतची होतें तिजला । ’राजहंस माझा निजला !’

जन चार भोंवतीं जमले । मृत बाळा उचलायाला ।

तो काळ नाथनिधनाच्या । हतभागि मना आठवला ।

तो प्रसंग पहिला तसला । हा दुसरा आतां असला !

तें चित्र दिसे चित्ताला !

हें चित्र दिसे डोळ्यांला !

निज चित्र चित्तनयनांला,

मग रडुनि वदे ती सकलां । ’राजहंस माझा निजला !’

करुं नका गलबला अगदीं । लागली झोंप मम बाळा !

आधींच झोंप त्या नाहीं । खेळाचा एकच चाळा !

जागतांच वार्‍यासरसा । खेळाचा घेइल आळा !

वाजवूं नका पाऊल !

लागेल तया चाहूल !

झोंपेचा हलका फूल !

मग झोंपायाचा कुठला ! राजहंस माझा निजला !

हें दूध जरासा प्याला । आतांसा कोठें निजला !

डोळ्याला लागे डोळा । कां तोंच भोंवतीं जमलां ?

जा ! नका उठवुं वेल्हाळा । मी ओळखतें हो सकलां !

तो हिराच तेव्हां नेला !

हिरकणीस आतां टपलां !

परि जिवापलिकडे याला--

लपवीन ! एकची मजला ! राजहंस माझा निजला !

कां असलें भलतें सलतें । बोलतां अमंगळ याला ?

छबकडयावरुनि माझ्या या । ओंवाळुनि टाकिन सकलां !

घेतें मी पदराखालीं । पाहूंच नका लडिवाळा !

मी गरीब कितिही असलें ।

जरि कपाळ माझें फुटलें ।

बोलणें तरी हें असलें---

खपणार नाहिं हो मजला ! राजहंस माझा निजला !

हें असेंच सांगुनि मागें । नेलात जिवाचा राजा ।

दाखविलाहि फिरुनी नाहीं । नाहिंत का तुम्हां लाजा ?

न्यावयास आतां आलां । राजहंस राजस माझा !

हा असा कसा दुष्टावा ?

कोणत्या जन्मिंचा दावा ?

कां उगिच गळा कापावा---

पाहुनी गरिब कोणाला । राझंस माझा निजला !

हे काळे कुरळे केश । खेळतात डोक्यावरतीं ।

ही दृष्टि पहा मम वदनीं । नेहमीं अशी ही असती ।

हें तेज अशा रत्‍नांचें । झालें का आहे कमती ?

कानांत नाचती डूल,

तोंडावर हंसरें फूल,

जीवाची घालुनि झूल---

मी असाच झांकिन याला । राजहंस माझा निजला !

या अर्ध्या उघडया नयनीं । बाळ काय पाहत नाहीं ?

या अर्ध्या उघडया तोंडीं । बाळ काय बोलत नाहीं ?

अर्थ या अशा हंसण्याचा । मज माझा कळतो बाई !

हें हंसें मुखावर नाचें !

जणुं बोल दुग्धपानाचे !

कीं मुक्या समाधानाचे !

इतुकेंहि कळे न कुणाला---। राजहंस माझा निजला !

या माझ्या मानससरसी । सारखें प्रेमजल वाही ।

त्या तरंगलहरींवरतीं । राजहंस पोहत राही ।

सारखा पोहुनी दमला । मग मला भुकेला वाही !

नयनांच्या शिंपांमधुनी,

अश्रूंचे मौक्‍तिकसुमणी,

मी दिले तया काढोनी,

मोत्यांचा चारा असला । राजहंस खाउनि निजला !

ते वैकुंठेश्वर गेले। पदिं त्यांच्या अर्पायाला ।

ही अखंड या अश्रूंची । वैजयंति मोहनमाळा !

मी करित असे केव्हांची । धरुनिया उराशीं बाळा ।

कौस्तुभ हा माळेमधला !

हृदयाचें कोंदण याला !

तो चोराया कां आला ?

दैत्याहुनि दैत्यांचे झाला ! राजहंस खाउनि निजला !

हें असें जाहलें म्हणतां । तरि देवचि निजला कां हो ?

जरि निर्दय होउनि निजला । आळवीन फोडुनि टाहो ।

कीं असा पोटचा गोळा । पोटांतचि देवा राहो !

ही कु‍र्‍हाड आकाशाची,

मजवरती पाडायाची,

नाहींच कल्पना त्याची,

हा तुमचा कावा सगळा ! राजहंस माझा निजला !

जरि दूत यमाचे आले । लाडक्यास या न्यायाला ।

ते निष्ठुर असले तरिही । भुलतील पाहुनी याला ।

हृदयाचें होउनि पाणी । लागतील चुंबायाला ।

मी मुका असा घेतांना---

हा पहा---पुन्हां हंसलाना !

कां अशा फिरवितां माना ?

सुख खुपे काय डोळ्यांला ? राजहंस माझा निजला !

हें सर्वस्वाचें फूल । त्या भोवतीं झाला गोळा ।

मी बघतें---कधिंचा आहे । त्यावरतीं तुमचा डोळा !

एकदां करावा त्याचा । वादानें चोळामोळा !

सर्वांच्या मनिंचा लाहो,

हाच ना ? स्पष्ट बोला हो,

मी इतकी वेडी का हो---

कीं हेंहि कळेना मजला । राजहंस माझा निजला !

जरि होउं नये तें झालें । तरि सोडणार या नाहीं !

पाळणाहि रुततो ज्याला । प्रेमें जरि निजवी आई !

तो देह खांच दगडांत-छेः । नको नको ग बाई !

हृदयाची खणुनी खांच,

झांकिन मी बाळ असांच,

दुःखांचे फत्तर साच !

जा ! जाउनि सांगा काळा । ’राजहंस माझा निजला !’

जरि काळाचाही काळ । बाळाला न्याया आला !

तरि नाहीं मी द्यायाची । या जीवाच्या जीवाला !

सारखीं गाउनी गाणीं । निजवीन कल्पवर याला !

जा ! करा आपुलें काळें !

माझेही दमले डोळे !

प्राणांचें पसरुनि जाळें---

मी निजतें घेउनि याला ! राजहंस माझा निजला !

सांगुनी असें सकलांशीं । मृत बाळ उराशीं धरुनी ।

तन्मुखीं स्वमुख ठेवोनी । चुंबिलें एकदां फिरुनी ।

पाहिलें नीट निरखोनी । झणिं तीही गेली निजुनी !

मग पुन्हां कधीं ती उटली,

जाणीव कुणा ही कुठली ?

परि मति या प्रश्नें हटली---

"बोलेल कोण या बोला । राजहंस माझा निजला !"

मग मातापुत्रांवरि त्या । तरु गाळिती कोमल पानें ।

ढाळिति लता निज सुमनें । पशुपक्षिहि रडती गानें ।

दशदिशा दगडही कढती । मन दुभंगुनी शोकानें ।

दुमदुमतें स्थळ तें अजुनी,

त्या एकच करुणागानीं,

जा जाउनि ऐका कानीं !

ऐकाल याच बोलाला ---’राजहंस माझा निजला !’

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP