चित्तकोकिला ! प्रेमा गाया जगद्गायनाला
पंचप्राणांचा पंचम तव लावि याच काला.
हृदयवसंतहि भुलला, भुलला जीव तुझ्या ग
वृत्तिलता बहारल्या, फुलांनीं विसरविलीं
प्रेमाश्रूंच्या मधुबिंदूंच्या करुं सेचनातें,
संतोषाच्या श्वासाच्या या मंदमंद वातें.
प्रेमरसाच्या या वर्षावें भूदेवी हृदयीं,
तृणांकुरांच्या रोमांचांची पेरणीहि व्हावी
चला मनाच्या मळ्यांत पेरुं प्रीतीचीं बीजें;
चित्तगीत-पुष्पें मग उधळूं; कोण उगिच लाजे ?
आज जगाची लाज सोडुनि होऊं या वेडे !
प्रीतिपटाच्या खालीं दडवूं जें जें मनिं तेढें.
पहा नदीच्या जलांत संध्यारंग उडया घाली !
हृदयनदाच्या जलीं पडूं द्या प्रीतीची लाली.
दीप तटींचे जलीं करविती किरणांचा नाच,
नयनदीपकिरणांस नाचवा हृदयजलीं साच.
काळ्या काळ्या ढगांढगांवरि संध्येची लाली,
काळीं हृदयें तशीं रंगतिल प्रेमें जरि धुतलीं.
उषा-संगमीं तप्त-करांचा रवि होई गार,
तद्विरहें तापतां जगावरि गाजवि अधिकार !
त्या मंगल संगमीं रंगले सृष्टीचे गवई,
मंजुळ गुंजारवें प्रीतिच्या गुणगुणती कांहीं !
आकाशाच्या लग्नमंडपीं लता करवल्या या,
वृक्षबालकां लाजुनि पल्लव सांवरितां दमल्या !
कळ्या कोंवळ्या, हलती कानीं डूल मजेदार;
उषा-वधूवरि सुमाक्षतांही करिती भडिमार,
नवरदेव नाचरा निघाला, ती पाठोपाठ---
लाजुनि झाली उषा दूर; कुणि द्या पदरा गांठ.
नव तेजाची साखर वंटित कोठें तीं लपलीं ?
स्त्रीपुरुषांची जोडी किंवा एकरुप झाली ?
श्रीमंतांच्या घरीं चालती खेळ असे फार,
परी गरीबां, प्रीतिदेवते ! तुझाच आधार !
क्षयी कलंकी चंद्रासाठीं, प्रेमा ! ऊठ तरी,
वसुंधरेशीं लग्न तयाचें लावी शीघ्र करीं.
दिशेदिशेच्या दिक्पालांनो ! सावधान सगळे !
संध्यापट-पीतांबर काढा; ताराबल जमलें.
प्रेममंगलाष्टकें सारखीं जगीं गाजवा हो;
मेघांचा चौघडा रणनिंचा जगीं वाजवा हो.
नक्षत्रांच्या करा अक्षता, शुभ मंगल बोला;
सप्तपदीची चाल चालवा सप्तभुवनिं सकलां.
दुग्धचंद्रिका जिकडे तिकडे नवरदेव ओती,
पुष्परेणु-शर्कराकणांची पृथ्वी करि भरती !
त्रिभुवनीं सार्या दुग्धशर्करा वांटा ही असली.
म्हणेल जग मग ’दुधात कीं या साखर ही पडली’
हृदयदीपिके ! प्रीतिदेवते ! मार्ग असा दावी,
जिकडे तिकडे शुभलग्नें हीं सारखींच लावीं !
चराचरांनो केवळ खेळा प्रेमाचे खेळ !
दुसरें तिसरें नकोच कांहीं करा हृदय-मेळ !
दिनरजनींची जोडी एकच, चांदणें न तिसरें--
त्या दोघांचें संमीलन हें जमलें एकसरें !
एकएकटया फिरतां कां ग, तारांनो ! गगनीं ?
जमवा जोडया प्रेमाच्या मग गा फिरतीं गाणीं !
निळ्या नभाला द्या ग उजळा शुभ्र चांदण्याचा,
प्रेमासाठीं प्रेमसागरीं खुशाल मग नाचा !
महासागरा ! उगाच लाटा उधळतोस कां रे ?
विझवी वडवानलासि पिउनी प्रेमाचें वारें !
नदामुखाचें चुंबन घेतां ज्या लाटा उठती,
त्याच तेवढया नाचूं दे; त्या प्रेमपाठ गाती !
हृदय सळसळे, फेंस उसळला, टाकुं नको खालीं,
त्या फेंसाचे गेंद रुपेरी नदीपदीं घालीं !
नदीनदीच्या पदीं बांधुनी प्रेमाचे चाळ,
नाचूं दे तुजभंवतीं त्यांना या रानोमाळ !
वनांत लपलेल्या वेलींनो ! या ग बाहेर !
वृक्षांचे कर धरुनी घ्या मग प्रेमाचे घेर
गवताचा गालिचा कोंवळा हळू हळू चाला,
पायघडया पसरल्या-फुलांचा सडा वरतिं घाला.
वार्यावरतीं वरात काढा जीवाभावांनीं,
वनदेवींच्या मुलिंनो ! या ग, या लौकर नटुनी !
कुणी गुलाबी पातळ नेसा, शालू कुणि हिरवा,
कुणि मोत्यांची जाळी लेउनि हव्या तशा मिरवा !
चला चला ग फुलाफुलाला देऊं या नांव !
जसा जयाचा येइल दिसुनी प्रेमाचा भाव !
शोभापुष्पें कमलें; नुसती शोभा त्यां ठावी !
काव्यपुष्पपदवीही दे त्यां सरस्वती देवी !
सूर्यकमल दिनपुष्प साजिरें दिवसभरीच फुले,
निशापुष्प तव बालक कुमुदिनि चंद्रा बघुनि खुले !
उषा-पुष्प जास्वंदीवरतीं तसा रंग त्याचा,
प्रथमपुष्प दिवसाचें भावहि अस्फुट वासाचा !
फुलें गुल्बशीवरतिं विहरती तांबुस अंगाचीं
संध्यापुष्पें संध्यासमयीं संध्यारंगाचीं.
तीन रंग दिवसांतुनि दावित फूल तेरडयाचें,
बालपुष्प तें; बालवृत्तिचे भडक रंग त्याचे !
यौवनपुष्पाचा निशिगंधा दिधला अधिकार;
हृदय खळबळे, वास दरवळे जों अपरंपार !
सुरकुतलें कोरांटीवरि जें कांठयांतिल फूल,
जरठपुष्प तें रजःकणांची वृथा उठवि धूळ !
एकलकोंडा नीरस भावहिं या धत्तूराचा,
स्माशानस्थ शिव सदा हावरा स्मशानपुष्पाचा !
धड न पांढरें, लालहि नाहीं, वासहि उग्र तसा,
गर्वपुष्प हें कण्हेर दावी, गर्वाचाच ठसा !
व्यर्थ पसारा वासावांचुनि या मखमालीचा,
दंभ-पुष्प परि नको, पथ न हा प्रेमळ चालीचा !
उगाच नांवें अशीं कशाला कुणास ठेवावीं !
मंगलकालीं मंगलवदनीं मंगलताच हवी.
लीला-पुष्पें खुल्या दिलाचीं या शेवंतीचीं,
मुग्धा-पुष्पें हीं जाईचीं कोमल वृत्तीचीं;
शुभ्र मोगरा दंतनिदर्शक हंसर्या तोंडाचा
हास्य-पुष्प तें; शुभ्र रंग हा दावित हास्याचा.
लालि गुलाबी जी लज्जेची रमणीच्या वदनीं;
गुलाब दावी लज्जापुष्पापरि ती निज सुमनीं.
मदपुष्पें हीं आम्रावरचीं मत्त मना करितीं,
पुण्य-पुष्प तुलसीदलिं साधी पुण्य मंजरी ती.
श्वासानें जें सुमन करपतें पारिजातकाचें,
हृदयपुष्प अतिकोमल तें अतिकोमल वासाचें.
सुकलें तरिही सुवास राखी; दृढतेचा भाव;
प्रेमपुष्प बकुलाचें वसवी प्रेमाचा गांव !
त्या गांवाचा, त्या नांवाचा कायमदायमचा
रहिवाशी हा जीव गातसे प्रेमपाठ तुमचा !
वनदेवींनो ! तुम्हांसाठिं हा थाट बारशाचा !
फुलाफुलांचें नांव दाखवी भाव आरशाचा !
फुलें तुम्ही घ्या, फुलें मला द्या, प्रेमाची ठेव,
कृष्ण घ्या कुणी, कृष्ण द्या कुणी, हीच देवघेव !
चला लतांनो ! मुलें बसवुनी कटिखांद्यावरतीं,
लग्न निसर्गासह लावी कविहृदयस्था प्रीति !
सृष्टिदेवता माता तुमची, कार्य तिच्या घरचें,
लग्न निघे माहेरघरीं मग आळस काय रुचे ?
हृदयपटावरि निजलज्जेचा लाल रंग उधळा,
प्रेमपल्लवीं लिहुनी कुंकुमपत्रें द्या सकलां.
प्रीतिदेविचें आज निघालें लग्न निसर्गाशीं;
वर्हाड जमलें, मुहूर्त भरला, धीर न कोणशीं,
वनदेवींच्या मुलिंनो ! या ग, या लौकर म्हणुनी,
पराग उधळित, सुवार पसरित, कोमल हातांनीं !
हिमवंतींच्या जलीं मिसळुनी मरंदमय तेला,
स्नान सुमंगल घाला कोणी प्रीतिदेवतेला !
शशिकिरणांचे तंतु भिजवुनी संध्यारंगांनीं,
अष्टपुत्रि द्या नव नवरीला कुणीतरी विणुनी.
हिमगिरिशिखरीं स्फटिकशिलांतरिं रविकिरणें शिरतीं,
प्रतिकिरणें पाझरती भराभर, अति कोमल असती.
मुग्ध अधरिंच्या गुलाबि रंगीं रंगवुनी त्यांना
त्या सूत्रांची काचोळी कुणि नवरीला द्याना !
पराग कोळुनि करुनि हरिद्रा उटी तिला लावा,
इंद्रधनुष्यें वळवुनि हातीं वज्रचुडा भरवा.
शुभ्र फुलांचें तेज आटवुनि घडवा कुणि त्याचीं
वेढिंविरोदीं; सौभाग्याचीं लेणीं पायांचीं
रात्रीचें तम, उषा-रक्तिमा, कांहिं नका टाकूं;
प्रीतिदेविच्या सौभाग्याचें हें काजळकुंकूं !
मणिमंगलसूत्रांत चांदण्या चंद्र चटकदार,
तिला तिच्या भाग्याचा भगवान् निसर्ग देणार !
संध्याकालीं संध्यापटिं जो असे सूर्य गगनीं,
भरा प्रीतिची ओटी असल्या खणांनारळांनीं.
मयासुराची माया शिकुनी कविकल्पकतेनें,
मंगलभूषणरचना मग ही करा शीघ्रतेनें
मुक्या मनाचीं म्हणा मंगलाष्टकें, जीं न सरतीं
हृदयाश्रूंच्या दिव्य अक्षता वधूवरांवरतीं !
खुल्या दिलांचा मिलाफ घडवा मुहूर्त हा सरतां,
अंतरंगिचा अंतःपटही दूर करा आतां !
शुभमंगल वच तूंच बोल श्रीमहन्मंगला रे !
हृदयाचा चौघडा वाजवुनि विश्व भरा सारें !
पाउल त्यांचें एक एक मग जन्माजन्माचें,
सात पावलें सात जन्मभर सप्तपदी नाचे !
पतिव्रतांनो ! मंगल विश्वचि तुमचें माहेर,
वधूवरांना मांगल्याचा कराच आहेर !
सकल वेलिनो ! वरात त्यांनी चला चला पाहूं,
ही सोन्याची संधी ! मागें नका कुणी राहूं !
लाजाळू लाजते कुणाला ? नका तिला रुसवूं !
चला चिमुकल्या करवलीस त्या जाउनिया हंसवूं.
वंशतरुवरा ! असाच गा रे प्रेमाचे सूर !
हृदयस्था हृदयाशिं धरा कुणि; नका राहुं दूर !
जनिं कीं रानीं, जलीं स्थलीं, वा गगनीं पाताळीं,
जिवाजिवाला बांधा पसरुनि प्रेमाचीं जाळीं !
जलदेवींनो ! स्थलदेवींनो ! गगनदेवतांनो !
सकलां शिकवा प्रेमपाठ; गा हाच अप्सरांनो !
हृदयशारदे ! हृदयिं राहुनी करि मज प्रेमकवी !
तुझ्या प्रीतिची स्फूर्तिच मज हा प्रेमपाठ शिकवी !
पशूस करशिल मानव ! मानव नेशिल देवपदा !
देवपणा स्थिर देवांचाही राखिसि तूंच सदा !
प्रेमतरंगें चित्त तरंगे, आत्माही रंगे !
जगत् रंगलें, विश्व रंगलें एक प्रेमरंगें !
चराचरांनो ! स्थिरास्थिरांनो ! नश्वर ईश्वर वा,
प्रेमें जिंका ईशा; साक्षात् कीं परमेश्वर व्हा !
हृदयसंपुटीं स्नेहिं पाजळुनि जीवाच्या ज्योती,
प्रीतीच्या गंगेंत सोडुनी गा मंगल अरती !
हृदयाचीं राउळें उघडुनी हृदयदेवतेला,
पंचेन्द्रियकृत प्रभावळीमधिं वरच्यावर झेला !
इतर वृत्तिंचा देवीभवतीं चालूं द्या नाच;
जीवेंभावें तिच्या पुढें गा प्रेमपाठ हाच !
चित्ताच्या ताटामधिं अर्पा निजपंचप्राणां;
त्या नैवेद्यें हृदयदेवता तृप्त होय जाणा !
प्रेम नसे तर जीव नको हा ! प्रेमें जग चाले !
प्रेमावांचुनि धिग् जीवन हें असे आज झालें !
प्रेमरसावर हृदय तरंगत प्रेमपाठ बोले,
मनांतलें हें गाणें माझें जनांतलें झालें !
प्रियमित्रांनो ! प्रेमरंगणीं प्रेमानें नाचा !
मुक्या मनाला फुटली आतां प्रेमाची वाचा !
प्रेमपाठ हा सदैव गा रे प्रेमानें ताज्या,
आण घालितों अशी तुम्हांका गळ्याचीच माझ्या !
चला गडयांनो ! या प्रेमाचीं ऋणें आधिं फेडा,
हेंच मागतों हात जोडुनी प्रेमाचा वेडा !
प्रेमपाठ हा सरता झाला, मन हो बेताल !
प्रेमरसें गुंगलें यावरी फुकट शब्दजाल !
त्या गुंगीच्या भरांत गातों पडुनि मना भूल !
क्षमा करा हो गातांना जरि होइ चूकभूल.
प्रेमपाठ हा रुचे कुणाला, न रुचे कवणाला,
एक नसे; जगिं आवडनावड तों ज्याची त्याला !
तशांत हें तर बोलुनिचालुनि मन वेडें झालें !
बंधन कसलें मग त्या ? गाई जें सुचलें रुचलें !
परवा न तया; हंसा रुसा, वा निंदा, कीं वंदा,
मी प्रेमाचा बंदा ! माझा हाच असे धंदा !
स्तुतिनिंदेचा भेदचि अवघा प्रेमजलीं जिरला,
भेदाभेदचि, न परि जीवही प्रेमांतचि विरला !
हृदयशारदा हृदयमंदिरीं चित्तरंग तारा,
छेडित बसली त्या गीताचा वाहे प्रेमझरा !
देहभरी त्या निर्झरलहरी थरथरुनी भिनल्या,
वृत्तिवृत्ति त्या गायननादें प्रेममयी बनल्या !
भाव बहिरला, जीव बहिरला, बहिरलाच आत्मा !
प्रेमरुपची, प्रेमलभ्यची, रमला परमात्मा !
त्या दोघांच्या या ऐक्याचा गाया जयवाद,
घुमत सारखा बधिरवृत्तिंतुनि प्रेमगीतनाद !
कायावाचामनसा हो उनि प्रेमाचा भाट
’गोविंदाग्रज’ आळवीत मग सदा ’प्रेमपाठ’ !