मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
ही एक आस मनिं उरलि ॥...

राम गणेश गडकरी - ही एक आस मनिं उरलि ॥...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


ही एक आस मनिं उरलि ॥

कन्हया ! बजाव बजाव मुरली ! ॥धृ०॥

जरि फुटले दोन्ही कान ॥ नच राही भूक तहान ॥

तिळभरही नुरलें भान ॥

बघ वृत्ति वृत्तिमचिं मुरली ॥ कन्हया ! बजाव०॥१॥

कां गाणें मजला व्हावें ॥ चित्तासहि नाहीं ठावें ॥

दृष्टीला केवि दिसावें ॥

मम आस नसे परि पुरलि ॥ कन्हय्या ! बजाव०॥२॥

मी अगदीं भोळी राधा ॥ तूं माधवजी ! नच साधा ॥

मोहिनी करी सुखबाधा ॥

तुज दासी विनवुनि झुरलि ॥ कन्हय्या ! बजाव०॥३॥

चांदणें चहूंकडे खुललें ॥ फत्तरही सारे फुलले ॥

आनंदें विश्वहि झुललें ॥

स्फूर्तीच त्यांत तव शिरलि ॥ कन्हय्या ! बजाव०॥४॥

तीनेंच शब्द मम निघती ॥ जग फिरुनि, फिरुनि मनिं रिघती ॥

मज आतां दुसरी न गति ॥

जगतींच सारी जणुं जिरलि ॥कन्हय्या ! बजाव०॥५॥

अणुरेणुहि देहीं स्वैर ॥ भिन्नता विसरली वैर ॥

अब नंदलाल ! कर खैर ॥

प्रेमाची दुनिया उरलि ॥ कन्हय्या!बजाव०॥६॥

बुद्धीचा तुटला धीर ॥ आशामय होय शरीर ॥

जलिं बुडे जलधिचें तीर ॥

बघबघतां दृष्टिहि विरलि ॥ कन्हय्या!बजाव०॥७॥

कथुं काय काय मज वाटे ॥ आनंद मात्र मनिं दाटे ॥

तरुशिरीं मूळ उफराटें ॥

शून्यांत परार्धें भरलिं ॥ कन्हय्या !बजाव०॥८॥

जन्माचें झालें चीज ॥ कायमची मेली नीज ॥

विश्वांचें गवसे बीज ॥

चिद्‌वृत्ति त्यांत अवतरलि ॥कन्हय्या !बजाव०॥९॥

मायेची मेली बिजली ॥ परि खर्‍या जलीं ती विझली ॥

तीव्रता तियेची थिजली ॥

सुकलेलीं विश्वें भिजलिं ॥कन्हय्या !बजाव०॥१०॥

कोसळति सरींवर सरी ॥ लहरींवर उठती लहरी ॥

अश्रूंची गरदी भारी ॥

अवकाशें तुडुंब सगळिं ॥कन्हय्या !बजाव०॥११॥

पुष्पाविण येई वास ॥ वार्‍याविण चाले श्वास ! ॥

हर्षविण आतां हास ॥

मरणाविण सुटका झाली ॥कन्हय्या !बजाव०॥१२॥

ब्रह्मगोल त्वन्मय झाला । चहुंकडेच मुरलीवाला ॥

त्वद्‌रुप गोपिकाबाला ॥

मी मला शून्य या कालिं ॥कन्हय्या !बजाव०॥१३॥

सांवळ्या यशोदाबाळा ! बंधाला पडला आळा ॥

स्वैराचा वाढे चाळा ॥

बावरी राधिका बनलि ॥कन्हय्या !बजाव०॥१४॥

किति करुं कन्हय्या ! धावा ॥ गा, नाच, वाजवि पांवा ॥

त्यांतच हा जीव विरावा ॥

यावांचुनि इच्छा नुरलि ॥कन्हय्या !बजाव०॥१५॥

एकेका ऐकुनि सूर ॥ दुःखाचा हो जरि चूर ॥

सारखी तरी हुरहूर ॥

न कळे ही लागे कसलि ॥कन्हय्या !बजाव०॥१६॥

तूं मनांतला चंडोल ॥ मग माझ्या मनिंचे बोल ॥

जरि हृदयीं लपले खोल ॥

तरि खोल हृदय या कालिं ॥कन्हय्या !बजाव०॥१७॥

बोल, बोल तव बिनमोल ॥ जीवाचें देइन मोल ॥

परि बोल एकदां बोल ॥

नातरी राधिका मुकलि ॥कन्हय्या बजाव०॥१८॥

फिर विश्वाचा हा गोल ॥ सांभाळुनि माझा तोल ॥

प्रेमाचा धरुनी सोल ॥

बघ मागुन राधा आलि ॥कन्हय्या बजाव०॥१९॥

मुरलीची प्यालें भांग ॥ धडिघडी थरारे अंग ॥

या लहरि उठति कां सांग ॥

आनंदवृत्ति पाझरलि ॥कन्हय्या ! बजाव०॥२०॥

उलगडति पीळ हृदयाचे ॥ जणुं सुटति बंध देहाचे ॥

कीं जीव देहभर नाचे ॥

कुणिकडे राधिका भकलि ॥कन्हय्या ! बजाव०॥२१॥

ही लहर अशा देहाची ॥ हालचाल आनंदाची ॥

चेतनाच कीं जीवाची ॥

तुज भेटाया जणुं आलि ॥कन्हय्या ! बजाव०॥२२॥

तिजमुळें होउनि दंग ॥ वार्‍यांत तरंगे अंग ॥

अणुअणुही होति दुभंग ॥

त्यांमाजि नादवी मुरलि ॥कन्हय्या ! बजाव०॥२३॥

हृदयाचे ठोके पडती ॥ अवकाश त्यांत जे उरती ॥

करि मुरलिरवाची भरती ॥

मग एकच धडकी सगळि ॥कन्हय्या ! बजाव०॥२४॥

मुरलीचा मंजुळ नाद ॥ हृदयांत खुलवि पडसाद ॥

मम जीवाची ही साद ॥

तुज हांका मारित सुटली ॥कन्हय्या ! बजाव०॥२५॥

सारखा मुरलि वाजीव ॥ अणुअणुसि देहिं दे जीव ॥

त्यांमाजि नाद गाजीव ॥

हृदयाचे पडदे उकलि ॥कन्हय्या ! बजाव०॥२६॥

जीवाच्या कमळा भुलवी ॥ निजगुंजारविं त्या डुलवी ॥

पाकळी पाकळी खुलवी ॥

झुलवी त्या पाडुनि भुरळिं ॥कन्हय्या ! बजाव०॥२७॥

कृष्णजी ! त्यांत तूं भृंग ॥ त्यांतच रे होई गुंग ॥

गुंजारव करि उत्तुंग ॥

ही मोहरात्र ओसरलि ॥कन्हय्या ! बजाव०॥२८॥

चांदणें खुले दिलरंगी ॥ हो एक नादरसरंगीं ॥

पोहत मी स्वैर तरंगीं ॥

बघ शुद्धबुद्ध मम हरलि ॥कन्हय्या ! बजाव०॥२९॥

या रसीं देहकन न्हाले ॥ जो तो निजनादीं डोले ॥

क्षणभराम्त सारे फुलले ॥

बघ फुलें तयांचीं झालिं ॥कन्हय्या ! बजाव०॥३०॥

करुनि त्या फुलांचा झेला ॥ जीवाचा छेलछबेला ॥

नटवीन कधीं अलबेला ॥

झेला मज आलें जवळि ॥कन्हय्या ! बजाव०॥३१॥

श्रृंगाररसानें नटली ॥ तुज राधा रमवूं झटली ॥

जन्मांची ओळख पटली ॥

कृष्णांत राधिका रमलि ॥कन्हय्या ! बजाव०॥३२॥

वांकडया अधरिं हा पावा ॥ वाकडाच डोळा डावा ॥

किती वेळ असाच पहावा ?

अब खेल करो वनमालि ! कन्हय्या ! बजाव०॥३३॥

श्वासें मज हृदयीं भरवीं ॥ नादें कीं ओढुनि नेई ॥

चुंबनें च कीं मज बनवी ॥

तव ओंठावरली लालि ॥कन्हय्या ! बजाव०॥३४॥

दृढ आलिंगन दे अथवा ॥ अवकाश न त्यांत असावा ॥

एकरुप जीवाभावां ॥

तव देहिं देह मन जिरवि ॥कन्हय्या ! बजाव०॥३५॥

बघ आतां घटका भरली ॥ बोलाची बोली सरली ॥

जीवाची भाषा हरली ॥

ठायींच वृत्तिही हरलि ॥कन्हय्या ! बजाव०॥३६॥

जीवाचा पंची प्यारा ॥ मज आतां दिससी न्यारा ॥

मुरलीचा पिउनी वारा ॥

चहुंकडेच राधा झुकलि ॥कन्हय्या ! बजाव०॥३७॥

उरलें न शीत वा उष्ण ॥ कांहीं न शुभ्र वा कृष्ण ॥

एकरुप राधाकृष्ण ॥

जयनाद गात ही मुरलि ॥कन्हय्या ! बजाव०॥३८॥

चहुंकडेच आतां शांत ॥ विश्व शांत, आत्मा शांत ॥

कृष्ण शांत, राधा शांत ॥

मुरलींत शांतता भरलि ॥कन्हय्या ! बजाव०॥३९॥

भोगुनी तापमय उष्णा ॥ मुरलिची लागतां तृष्णा ॥

जग गाइल राधाकृष्णां ॥

ही साक्ष मनोमन मुरलि ॥कन्हय्या ! बजाव०॥४०॥

ही अखंड मुरली वाजे ॥ सर्वांच्या हृदयीं गाजे ॥

मग कोण बदाया लाजे ?--

’कीं धन्य धन्य ही मुरलि’ ॥कन्हय्या ! बजाव०॥४१॥

त्या नादरसाचे प्याले ॥ मनिं ’गोविंदाग्रज’ प्याले ॥

शाहीर मुरलिचे बनले ॥

मन गानिं वाजविति मुरली ॥कन्हय्या ! बजाव०॥४२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP