राम गणेश गडकरी - जबरदस्तिचा हुकूम माझा ऐकु...
राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
जबरदस्तिचा हुकूम माझा ऐकुनि काळा ! थांबा जरा ॥
बजावणें हें माझें तुजला, शक्तीचा हा जोर खरा ॥
ऐकुनि जाशिल पुढें तसाची, तुझाच होइल तरि तोटा ॥
दटावणी ही फोल नसे; बा शब्द एक नाहीं खोटा ॥
ब्रह्मचारि वैरागीं वळकट शून्याच्या हातीं सोटा ॥
निःसंगाची सोबत माझी ब्रह्मांडाचा करिं लोटा ॥
गाणें माझें काळा ! पाडिल चराचराला भुलावणी ॥
जो तो होइल ठायिंच बेडा ओळखील ना कुणा कुणी ॥
अवसानाच्या भरांत घेइअन रविचंद्रांची झांज करीं ॥
दिनरजनीची जोडी ही तव क्षणांत मूर्खा ! वांझ तरी ॥
गाणें ऐकुनि या त्या सूर्याचा प्रकाश होइल गार अति ।
विरतिल तारा; रस पाझरतां तशी चंद्रिका अखंड ती ॥
दिनरजनीची जोडि फोडिसी नीरस अससी किती तरी ॥
एका काळीं, एका ठायीं दोघां मी रमवीन परी ॥
एकरूप तीं करितां यापरि झांज करीं रविचंद्रांची ॥
दिनरजनींचा खेळ बंद; जणू उघडझांप तव डोळ्यांची ॥
उभें ठेवितां समोर माझ्या ब्रह्मांडा करुनी वेडें ॥
अंधा ! ऐसा एकटाच तूं जाशिल कोठें सांग पुढें ? ॥
म्हणुनि सांगतों हुकूम माझा ऐक, नको करुं वृधा त्वरा ॥
बजावणें हें माझें तुजला; शक्तीचा हा जोर खरा ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 16, 2012
TOP