राम गणेश गडकरी - रात्रीस ओरडणार्या घुबडास...
राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
रात्रीस ओरडणार्या घुबडास
वसंततिलका
जेव्हां धरी निजनिभा रवि आवरोनी ।
तिग्मांधकार करि कृष्ण जगा भरोनी ॥
जेव्हां अशेष जग निद्रित नीडभागीं
जेव्हां सजीव जगता चलताहि त्यागी ॥१॥
जेव्हां न ये श्रुतिपथावरि शब्द कांहीं ।
भावि स्थिती जग धरी जनुपूर्व वा ही ॥
होई अशांत रव कर्कश तावकीन ।
जो त्रास, दे, खग मना करि भीतिदीन ॥२॥
आधींच भीषण निशा, तम त्यांत घोर ।
चोंहींकडे वन भयंकर; भीति थोर
येतां अशांत तव तापद शब्द कानीं ।
घोर स्थितीसि जणुं पूर्णदशेस आणि ॥३॥
तो शांतिमंग करि कष्टवि लोकचित्ता ।
होतां पुरी भयद ग्रंथिक रोगग्रस्ता ॥
जैसा करी जनमनांप्रति भीतियुक्त ।
“श्रीराम” शब्द शववाहकसंघ-उक्त ॥४॥
प्रौढा रवासि ऐकुनि भीतचित्तें ।
ऊरःस्थलीं द्दढ धरी निज बालकातें ॥
मुग्धा समीप शयितस्वधवांगभागीं ।
वेष्टीत चंदनतरुप्रति जोविं नागीं ॥५॥
चिंती धवा कुशल ती विरहार्त बाला ।
तोडी तशी उपवरा स्वविचारमाला ॥
ऐसें खगा ! तव रवा जन अज्ञ भीती ।
भीतो तसें तुज अमंगल मानिताती ॥६॥
आहेत अन्य खग जे तुजहूनि थोर ।
कांहीं तुझ्याहुनि रवा करिती कठोर ।
तूतें च कां मग कथी जन सर्व भीती ?
शब्दा तुझ्या अशुभसूचक मानिताती ? ॥७॥
केलेंस पातक असें वद काय वा रे ।
किंवा गमे तव मना “ जन मूर्ख सारे !” ॥
छे ! लोक मूर्ख न; पडे तुजलागिं भ्रांती ।
घूका ! तुला जन सकारण निंदिताती ॥८॥
तूं घोर शब्द करिसी भलत्याच काळीं ।
लोकांसवें नससि, रीति तुझी निराळी ॥
रात्रीस तूंच फिरसी खगजात्यमित्रा !।
सूर्यप्रकाश दिपवीत तुझ्याच नेत्नां ॥९॥
यानेंच लोक उलुका ! तुजलागिं भीति ।
शब्दा तुझ्या अशुभसूचक मानिताती ॥
बा ठेव या सुनियमास सदैव चित्तीं ।
“लोकानुसारि नसतां जन निंदिताती ” ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 14, 2012
TOP