जादूची माझी बाग
तींत फुलें जागोजाग;
रम्य जरी बागाईत;
तरी तिची न्यारी रीत;
कळी कोंवळी चांफ्याची
मिटलेली ती कायमची;
जरि न कधीं उमलायाची
करिल वृष्टि तरि वासाची;
तशाच कोणी,
सूत्रावांचुनि
दिधल्या रचुनि
कुंदाच्या वेण्या दोन
मोल जिवाचा त्यां होन !
नाही पाणी जरि भंवतीं
तरी दोन कमळें हंसतीं;
जन्म जलामधिं कमळांचा
न्याय असे हा जगताचा;
परि या कमळांच्या रंगा
खेळे प्रेमाची गंगा !
तुमच्या जगतीं,
किरणें पडतीं,
कमळें फुलतीं,
परि माझीं कमळेंच बघा
निजकिरणीं खुलविती जगा
गुलाब होते दोन तसे,
आनंदाचे गोड ठसे;
कळ्यावांचुनी फुललेले
कांठयांच्या त्रासा चुकले;
जणूं फडकती मौजेचीं
नवीं निशाणें लाजेचीं !
गुलाब असले
हांसत बसले,
मनांत ठसले,
हृदयीं धरिलें या भावा
एकतरी काढुनि न्यावा !
परी फुलें तीं जादूचीं;
लपंडाव खेळति साचीं;
रक्षण त्यांचें करणार
मनांतला जादूगार !
दिसतां हातीं लागत ना,
वेड लागलें तेंच मना;
क्षणांत फुलतीं,
क्षणाम्त लपतीं;
दिसतीं हंसतीं,
घेर घेतला गिर्कीचा
फेर थरकत्या फिर्कीचा
निश्चय केला जिंकाया
जादूची असली माया;
तोंदानें उडवायाचा
मंत्र हाकिला प्रेमाचा;
श्वासानें हृदयीं भरिला
मनिं वाटे आतां धरिला ;
परि तो कुठला
गवसायाला !
तसाच उरला,
अधिक पसरला चहूंकडे,
तोडितांच उलटा वाढे !
यत्न मांडिला तोच पुन्हां
जीव गुलाबावीण सुना;
स्वस्थानांतुनि हलत नसे
काढावा तो वाटतसे;
गुलाब तर न मिळे मजला
परि कांटे मम देहाला !
त्या कुसुमाचे
संसर्गाचे
कांटे साचे
मांडिति अंगीं थैमान !
कांठयांचें माजे रान !
कोण असा जादूगार
खेळ करी हा अनिवार ?
उघडयावरती टाकुनियां
राखी ती फुलती दुनिया
चोरितांच वाटे ऐशी !
चोरीची थट्टा खाशी !
चित्त शरमलें
जरी विरमलें
तरिही रमलें;
चोरी असली लाजेची
वाटे त्याला मौजेची !
अशी निराशा भरे मनीं
शरीर भरलें कांठयानीं
गुलाब मज हांसत बसला
हाताशीं नाहीं आला;
नवल तरी कैसें होई-
दुःख निराशा नच देई !
न कळे कांहीं,
हुरहुर कां ही ?
वेचें मनही
कां विनवितसे देवासी ?---
निराशाच दे गोड अशी !